डोंबिवलीमध्ये आज भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चित्रावर काळं फासण्यात आलं. देशाचे चौथे पंतप्रधान राहिलेल्या देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईसहीत महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करत आंदोलने करणाऱ्या मराठी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याने अशा व्यक्तीचं उद्दातीकरण डोंबिवलीसारख्या संस्कृतिक शहरात होता कामा नये असं म्हणत या फोटोला काळं फासण्यात आलं आहे.
कल्याण-डोंबिवली शहराला जोडणाऱ्या समांतर रस्त्यालगत असलेल्या भिंतींवर खेळाडू, क्रांतिकारक ,देशातील नेते ,वैज्ञानिक अशा विविध मान्यवरांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. यामध्ये मोरारजी देसाई यांचं चित्रही रेखाटण्यात आलं आहे. या चित्राला मराठी एकीकरण समितीने विरोध केला. आज सायंकाळच्या सुमारास समांतर रस्त्यावरील या चित्राला मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मोरारजी देसाई यांच्या नावाला काळे फासून तसेच त्यांच्या चित्रावर काळ्या रंगाचा स्प्रे उडवून मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करत आंदोलने केली. मात्र मोरारजी देसाई यांनी सत्तेचा गैरवापर करत दडपशाहीद्वारे गोळीबारचा आदेश दिला ज्यात १०७ हुतात्मा झाले अशा व्यक्तीचे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहरात उदात्तीकरण होते ही फार खेदाची बाब असल्याची भूमिका मराठी एकीकरण समितीने मांडली. या भिंती चित्रावरील मोरारजी देसाईंच्या नावाला काळं फासण्याबरोबरच या चित्रावर निषेध आणि मराठी असे शब्द काळ्या स्प्रेने लिहिण्यात आले.
मराठी एकीकरण समितीचे कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष निलेश सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, “महाराष्ट्रद्वेषी मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्याच्या वेळी मराठी माणूस संविधानिक पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत होता, त्याच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. अशा व्यक्तीचं उद्दातीकरण डोंबिवलीसारख्या संस्कृतिक शहरामध्ये होतं ही फार शोकाची गोष्ट आहे,” असं म्हटलं.
पुढे बोलताना सावंत यांनी, “या अशा गोष्टींच्या उद्घाटनासाठी आयुक्तांसारखे अधिकारी सुद्धा येतात ती आमच्यासाठीही निषेधाची गोष्ट आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असं चित्रिकरण होतं तेव्हा सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, तसेच महाराष्ट्रद्वेषी कार्य होणार नाही ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असंही म्हटलं.
तसेच, यापुढे अशी कोणतीही गोष्ट घडली तर आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करतोय, असंही सावंत म्हणाले. दरम्यान घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत समितीच्या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.