अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलांच्या आरंभाला रंग

घोडबंदर मार्ग ठाण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

|| किशोर कोकणे

रात्रीचे अपघात टाळण्यासाठी एमएसआरडीसीची उपाययोजना; राज्यातील पहिलाच प्रयोग ठाणे शहरात

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या चार उड्डाणपुलांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उड्डाणपुलांच्या आरंभाचा भाग रंगवण्यात येणार आहे. दिवसाचा सूर्यप्रकाश शोषून रात्रीच्या अंधारात चमकणारा ‘फॉस्फोरेसेन्ट’ रंग लावल्यामुळे पुलाच्या चढणीचा अंदाज येऊन वाहनचालक सावधपणे वाहने चालवतील, असे महामंडळाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. राज्यात प्रथमच हा प्रयोग ठाण्यात होणार आहे.

घोडबंदर मार्ग ठाण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरील वाहनांचा भार वाढल्याने काही वर्षांपूर्वी कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या परिसरांत उड्डाणपूल तयार करण्यात आले. याची देखभाल आणि दुरुस्ती एमएसआरडीसीकडून केली जाते. उड्डाणपुलांच्या पायथ्याला पुरेशा उपाययोजना       नसल्याने रात्रीच्या अंधारात चढणीचा मार्ग नेमका कोठून सुरू होतो याचा अंदाज वाहनचालकांना येत नसतो. त्यामुळे अनेकदा येथील वाहने उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकत असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक शाखेनेही एमएसआरडीसीला वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर ‘एमएसआरडीसी’ने यासाठी योजना आखली असून पुलांच्या आरंभी ‘फॉस्फोरेसेन्ट’ रंगाचे पट्टे मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने निविदा काढली असून यासाठी ९ लाख २१ हजार इतका खर्च येणार आहे.

योजना काय?

कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ ही उड्डाणपुलांच्या पायथ्याशी ५० मीटरपर्यंत हे रंगांचे पट्टे आखण्यात येणार आहेत. हा रंग सकाळचा सूर्यप्रकाश खेचून घेतो. त्यानंतर रात्री चमकतो. हा रंग टिकाऊ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री चमकणाऱ्या या रंगामुळे वाहनांना उड्डाणपूल कुठून सुरू होतो याचा अंदाज येणार आहे. त्यामुळे अपघातांचा धोका टळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Msrdc measures to prevent night accidents akp