वर्सोवा खाडीवर पाचपदरी पूल; कोणत्याही सिग्नलविना रहदारी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडी पुलावर होत असलेल्या नव्या पाचपदरी पुलामुळे याठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. या पुलाचे संकल्पचित्र नुकतेच जाहीर झाले आहे. या चित्रानुसार वर्सोवा नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी आता सिग्नलची आवश्यकताच राहणार नसून येथील वाहतूक विनाअडथळा सुसाट सुरू राहणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग वर्दळीचा मार्ग आहे. वर्सोवा नाक्याजवळ एक रस्ता सरळ वसईच्या दिशेने आणि एक रस्ता ठाण्याकडे जातो. या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूकदेखील सातत्याने होत असते. यातील काही वाहने ठाण्याकडेदेखील वळत असल्याने नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शनिवार आणि रविवार आणि सलग येणाऱ्या सुट्टय़ांच्या दिवशी खासगी वाहनेदेखील मोठय़ा संख्येने या मार्गावर येत असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडत असते. वाहने तासन् तास या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळेच याठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आता खाडीवरील नव्या पुलासह येथील वाहतूक व्यवस्थेची नव्याने आखणी करण्यात आली असल्याने या सिग्नलची आवश्यकताच उरलेली नसून मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि ठाण्याला जाणारा मार्ग या दोन्ही ठिकाणची वाहतूक विनाअडथळा सुरळीतपणे सुरू राहणार आहे.

या महामार्गावरची वाहने सध्या मुंबईकडून वसईच्या दिशेने जातात आणि ठाण्याकडेही वळतात, हीच परिस्थिती वसईहून येणाऱ्या वाहनांची आहे. ही सर्व वाहने वर्सोवा नाक्यावर अडकत असल्याने नाका कायम वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला असतो. खाडीवरील जुना पूल कमकुवत झाल्याने याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

११ जानेवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही होणार आहे. या नव्या पुलाचे नकाशे तयार

करताना नाक्यावरच्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका व्हावी अशा रीतीने ते तयार करण्यात आले आहेत.

वाहतूक अशी होईल..

  • या नकाशानुसार खाडीवर नव्याने बांधण्यात येणारा पूल थेट वर्सोवा नाका ओलांडून उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून वसईच्या दिशेने जाणारी तसेच वसईहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थेट या पुलावरूनच जातील.
  • ज्या वाहनांना मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जायचे आहे, अशी वाहने नवा पूल सुरू होण्याआधीच डावीकडे वळवण्यात येणार असून पुलाच्या खालून ती ठाण्याकडे जाणार आहेत.
  • ठाण्याहून वसईच्या दिशेने जाणारी वाहने नाक्यावरून उजवीकडे वसईच्या दिशेने न वळता नव्या पुलाखालून सरळ पुढे जातील आणि वळण घेऊन नव्या पुलावर येतील. त्यानंतर वसईकडे जातील.
  • या व्यवस्थेमुळे वाहने एकमेकांसमोर येण्याची वेळच येणार नाही आणि वाहतूक कोणत्याही सिग्नलशिवाय विनाथांबा सुरळीतपणे सुरू ठेवणे शक्य होणार आहे.

तात्पुरती वाहतूक कोंडी

रस्त्यावरील असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे याठिकाणी पुलाचे आणि रस्त्याचे काम करणे हे एक आव्हान ठरणार असून कामादरम्यान काही काळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, परंतु पूल झाल्यानंतर मात्र वाहनचालकांना इथल्या वाहतूक कोंडीतून कायमचा दिलासा मिळणार आहे.