पालिका महासभेत तीन वर्षांत सर्वाधिक प्रश्न गृह प्रकल्पांबाबत
कॉसमॉस समूहाचे सर्वेसर्वा सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे ठाणे महापालिकेतील ठरावीक नगरसेवकांच्या कार्यपद्धतीभोवती संशयाचे गूढ उभे राहिले असतानाच गेल्या तीन वर्षांत महापालिकेतील बहुतांश नगरसेवकांनी बिल्डर, त्यांचे विकास प्रस्ताव, विकास हस्तांतरण हक्काचा वापर आणि विकास आराखडय़ातील रस्त्यांसंबंधीच्या प्रश्नांची प्रशासनावर सरबत्ती केल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्नांद्वारे आयुक्तांकडून उत्तर मागण्याचा नगरसेवकांना अधिकार असतो. या अधिकाराचा पुरेपूर वापर करत नगरसेवकांनी उपस्थित केलेले बहुतांश प्रश्न हे बिल्डर आणि त्यांच्या विकास प्रस्तावांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.
सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात ठाणे महापालिकेतील काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याची माहिती पुढे आली आहे. परमार यांच्या काही गृह प्रकल्पांविषयी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. महापालिकेतील नगरसेवकांचा एक मोठा गट सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समिती सभांमध्ये या प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत होता. तसेच यापैकी काही प्रकल्पांचा वाद न्यायालयातही पोहचला होता. त्यामुळे परमार यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रातील नगरसेवकांच्या उल्लेखांविषयी उलटसुलट चर्चा आता रंगल्या आहेत. ठाणे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास करताना महापालिकेतील सभांचे इतिवृत्त मागवून घेतले असून कॉसमॉस समूहाविषयी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला जात आहे.

७५ टक्के प्रश्न बिल्डरांचेच
’ठाणे महापालिकेतील सभांमध्ये नगरसेवक उपस्थित करत असलेले प्रश्न आणि त्यांच्या स्वरूपाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी गेल्या तीन वर्षांत बिल्डर आणि त्यांच्या प्रकल्पांच्या अवतीभवतीच हे प्रश्न फिरत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहेत.
’२०१२ पासून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला असता एकूण प्रश्नांपैकी ७५ टक्के प्रश्न हे विविध बिल्डरांच्या प्रकल्पांशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.
’ठाणेकरांच्या दैनंदिन समस्यांशी संबंधित असे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठरावीक बिल्डरांचे प्रकल्प, त्यांना मंजूर करण्यात आलेले चटईक्षेत्र, विकास हस्तांतरण हक्काचा विनियोग, विकास आराखडय़ातील रस्त्यांसंबंधी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे उघड होत आहे.
’ अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात शिवसेनेचे काही ज्येष्ठ नगरसेवकही आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच कॉसमॉस समूहातर्फे उभारण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांसंबंधी यापूर्वीही प्रश्न विचारले गेल्याचे मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
’मुंबई महानगर विकास प्राधिकरण, म्हाडा यासारख्या विविध संस्थांनी आखलेल्या योजनांचा उपयोग करत शहरातील अनेक भागांमध्ये बडय़ा विकासकांचे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पांविषयी अनेक प्रश्न गेल्या तीन वर्षांतील सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आल्याचे दिसून येते.