आमदार चव्हाण यांना शह देण्यासाठी शेलार यांचा पत्ता कापला
कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक संदीप गायकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने गायकर यांची निवड निश्चित मानली जात होती.
पालिकेतील सत्ता स्थापनेच्या युतीमधील करारानुसार दोन वर्ष भाजपकडे स्थायी समितीपद असणार आहे. त्यानुसार स्थायी समितीच्या पहिल्या वर्षांसाठी गायकर यांची निवड झाली. गायकर यांच्या निवडीमुळे खासदार कपिल पाटील गटाने समितीवर वर्चस्व मिळविले असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. सभापतीपदासाठी गायकर यांचा एकमेव अर्ज आला होता. समोर प्रतिस्पर्धी नसल्याने गायकर यांची सभापतीपदासाठी बिनविरोध निवड झाली.
पालिका निवडणुकीत डोंबिवलीतून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महापौरपद कल्याणला मिळाले आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपद डोंबिवलीला मिळावे यासाठी भाजपचा डोंबिवलीतील गट प्रयत्नशील होता. यासाठी आमदार रवींद्र चव्हाण प्रयत्नशील होते. परंतु, खासदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले खास संबंध आणि कल्याण भाजपमध्ये असलेली ताकद यामुळे डोंबिवलीतील नगरसेवक शिवाजी शेलार यांच्याऐवजी गायकर यांची निवड करण्यात आल्याचे भाजपच्याच गोटात बोलले जात आहे. तर आ. चव्हाण यांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपमधील खेळीतून गायकर यांची निवड करण्यात आली असल्याची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.