बेकायदा बांधकामप्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना सरळ घरी बसवल्यानंतर अशाच प्रकररणांत अडकलेल्या आणखी १४ सर्वपक्षीय नगरसेवकांवर नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळेच ‘मुंढे हटवा’ मोहिमेला अधिकच जोर चढल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेनेच्या एका बडय़ा पदाधिकाऱ्याला याप्रकरणी नुकतीच नोटीस काढण्यात आल्याने मोठय़ा मेहनतीने मिळवलेल्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातून निसटतील या भीतीनेच एरव्ही राष्ट्रवादीशी उभा दावा मांडणाऱ्या शिवसेना नेत्यांनी ‘मुंढे हटवा’ मोहिमेसाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत नवी मुंबईत बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. महापालिकेचे आयुक्तपद भूषविणाऱ्या अधिकाऱ्यांनी या वास्तवाकडे डोळेझाक केली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या बांधकामांवर काही प्रमाणात वचक बसला असून ठरावीक राजकीय नेते मात्र कमालीचे अडचणीत आले आहेत. दिघा परिसरातील राष्ट्रवादीच्या तिघा नगरसेवकांचे मुंढे यांनी बेकायदा बांधकामांप्रकरणी पदच रद्द केले. आता आणखी १४ नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना पळता भुई थोडी झाल्याचे चित्र आहे.

तिजोरीवरचा ताबा धोक्यात

काही महिन्यांपूर्वी एका काँग्रेस नगरसेविकेला गळाला लावत स्थायी समितीवर शिवसेनेचा सभापती निवडून आल्याने नवी मुंबईत महापौर राष्ट्रवादीचा तर सभापती शिवसेनेचा अशी विचित्र राजकीय परिस्थिती आहे. दीड हजार कोटी रुपयांच्या आसपास अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेच्या आर्थिक नाडय़ा हाती आल्याने शिवसेना नेत्यांना हर्षवायू झाला होता. मात्र, एका बेकायदा बांधकाम प्रकरणामुळे ही आर्थिक पकड ढिली होत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेने राष्ट्रवादीशी संगनमत करत मुंढे हटवा मोहिमेला पाठबळ दिल्याची चर्चा आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर हातोडा फिरू लागताच झालेल्या मुंढेविरोधी आंदोलनातही शिवसेना नेत्यांनी तटस्थपणाची भूमिका घेतली होती. मात्र, महापालिकेच्या तिजोरीवरील ताबा धोक्यात आल्यानेच शिवसेना नेते राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यासाठी सरसावल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला आमचा विरोध कायम असून या मुद्दय़ावर शिवसेना कधीही तडजोड करणार नाही.  प्रकल्पग्रस्त, व्यापारी, अल्प उत्पन्न गटाच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा पडत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.

– विजय चौगुले, विरोधी पक्षनेते

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai politicians across parties come together to oppose commissioner tukaram mundhe
First published on: 24-10-2016 at 01:50 IST