देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा टप्पा १७ मे पर्यंत वाढवलेला आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अनेक करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने यावर नवीन तोडगा काढला आहे.

महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ८ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असल्याचं समजतंय. मुंबईत कामानिमीत्त जाणाऱ्या व डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींना गेल्या काही दिवसांमध्ये करोनाची बाधा झाल्याचं दिसून आलंय. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

कल्याण-डोंबिवलीत करोना बाधित रुग्णांच्या संख्येने २०० चा आकडा ओलांडला आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामाला असणाऱ्या अनेक व्यक्तींचा गेल्या काही दिवसांमध्ये सतत प्रवास सुरु आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था स्वतंत्र केली जावी अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने हा तोडगा काढलेला आहे. मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला पाठवण्यात यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. केल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ११ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.