थकबाकीधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा

पालिकेने सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २७१ कोटींचे उत्पन्न निश्चिात केले आहे.

संग्रहीत

 

मीरा-भाईंदरमध्ये तीन हजार थकबाकीदार

भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या ३ हजारांहून अधिक थकबाकीधारकांना पालिका प्रशासनामार्फ़त अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मीरा भाईंदर शहरात सुमारे ३ लाख ४२ हजार मालमत्ता असून त्यात निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ८७ हजार तर व्यावसायिक मालमत्तांची संख्या ५५ हजार इतकी आहे. पालिकेने सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २७१ कोटींचे उत्पन्न निश्चिात केले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशभरात करोनाच्या  टाळेबंदी नियमामुळे पालिकेची आर्थिक कोंडी  झाली आहे. पालिकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली करोनामुळे रखडल्यामुळे पालिकेकडून अधिकाधिक उत्पन्ना प्राप्त करण्याकरिता पावले उचलण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १२५ करोड रुपयांची मालमत्ता कर वसुली झाली आहे. मात्र यात अजून वाढ करणे अपेक्षित आहे.

त्यामुळे मागील काही वर्षापासून कर भरणा न केलेल्या व तीन हजार रुपयांहून अधिक कर बाकी असलेल्या १ लाख हून अधिक थकबाकीदारांना कर संकलक सुदामा गोडसे यांच्याकडून अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . यानंतरही कर भरणा न केल्यास शास्ती कर , जप्तीची कारवाई, विक्रीची नोटीस व  त्यानंतर मालमत्तेची विक्री केली जाणार आहे . तसेच पाच लाख रुपयांहून अधिक  थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडून नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

थकबाकीधारकांची बँक खाती बंद करणार

गेल्या अनेक वर्षांपासून नोटिसा बजावूनदेखील अनेक थकबाकीधारक मालमत्ता कराचा भरणा करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा थकबाकीधारकांची यादी प्रशासनाने तयार केलेली असून त्याची बँक खाती बंद करण्याचा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला आहे.  बँक प्रशासन  कारवाईला सहकार्य करणार असल्याची माहिती  कर निर्धारक आणि संकलन विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Notice of confiscation of property to arrears akp