ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. त्यावर पालिकेकडून ६ जूनपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत दिली होती. या मुदतीत पालिकेकडे केवळ तीन हरकती प्राप्त झाल्या असून त्यापैकी एक हरकत आरक्षणाऐवजी प्रभाग रचने संदर्भातील असल्याने पालिकेने ती फेटाळून लावली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेची निवडणुक तीन सदस्य पद्धतीने होणार आहे. शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी  असून यानुसार एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४६ प्रभाग तीन सदस्यांचा तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांमधून एकूण १४२ नगरसेवक निवडुण जाणार आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ७१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडतद्वारे नुकतेच आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी अयोगाने थेट आरक्षित केलेल्या १० प्रभागांपैकी ३, १२, १५, २३, २९ मधील अ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तर, १०, २४, २७, ३४ आणि ४४  मधील ‘अ’ अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी अयोगाने थेट आरक्षित केलेल्या ३ प्रभागांपैकी ५ अ, २९ ब जागा महिलांसाठी तर, ६ अ जागा अनुसूचित जमातीच्या पुरुषांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ६४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ जागा निवडणुक आयोगाने नेमुन दिल्या होत्या. तर उर्वरित १७ जागांकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणासंदर्भात ६ जूनपर्यंत हरकती सादर करण्याची सूचना पालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार पालिकेकडे केवळ तीन हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका हरकतीमध्ये आरक्षण सोडतऐवजी प्रभागांच्या रचनेवर हरकत घेण्यात आली आहे. प्रभागांचा प्रारुप आराखडा प्रसिध्द झाला, त्यावेळेस ही हरकत देणे अपेक्षित होते. त्यामुळे पालिकेव ही हरकत फेटाळून लावली आहे. तसेच दुसरी हरकत प्रभाग क्रमांक १५ च्या बाबतीत असून त्यामध्ये प्रभागाच्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरून हरकत घेण्यात आली आहे. अशाच स्वरुपाची हरकत आणखी एका प्रभागावर घेण्यात आली.  या तिन्ही हरकतींवर पालिकेकडून उत्तरे देण्यात आली आहेत ,अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.