अंबरनाथ : कल्याण ते बदलापूर हा अंबरनाथ, उल्हासनगरमार्गे जाणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग पूर्णत्वास जात असला तरी या मार्गावरची अडथळय़ांची शर्यत संपताना दिसत नाही. काही दिवसांपर्यंत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खोदल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. आता रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या विद्युत खांबांमुळे अपघात होऊ लागले आहेत. नुकतीच एक रिक्षा अशाच एका खांबाला धडकून अपघात झाला. त्यामुळे आता या रस्त्यातील विद्युत खांब धोकादायक बनले आहेत.
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर ते कल्याण असा जाणारा कल्याण-बदलापूर राज्य मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत होता. या रस्त्याचे काम रखडल्याने यावर अनेक अपघात झाले. गेल्या काही महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्णत्वास जात असताना संबंधित कंत्राटदाराने उपलब्ध जागेत रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करून टाकले आहे. मात्र, काही भाग अजूनही उभारणीच्या प्रतीक्षेत आहे.
या रस्त्यावर शास्त्री विद्यालय चौक ते डीएमसी चौक या भागात जलवाहिन्यांसाठी तीन ते चार वेळा खोदकाम करावे लागले. यातील एका खड्डय़ात एक रिक्षा जाऊन पडली होती. तर खोदकामाच्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना मोठा काळ त्रास सहन करावा लागला. हे खोदकाम पूर्ववत झाल्यानंतर आता रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. शास्त्री विद्यालयाकडून सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सुरुवातीचा भाग अरुंद आहे. येथून वाहने ग्लोब बिझनेस पार्कपर्यंत आल्यानंतर मोठय़ा रुंद रस्त्यावर जातात. अनेकदा वाहन वेग घेत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेले आणि रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मध्ये आलेले विद्युत खांब समोर येतात. त्यामुळे अनेकदा वाहन चालकांचा अंदाज चुकून अपघात होत आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास अशाच प्रकारे एक रिक्षा या विद्युत खांबाला जाऊन धडकली. रात्री हे विद्युत खांब वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती व्यक्त करत तातडीने खांब हलवण्याची मागणी होत आहे.
निविदेची प्रतीक्षा
रस्त्याची उभारणी करणाऱ्या एमएमआरडीएवर या विद्युत खांबांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची निविदा जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. या कामावर देखरेख ठेवणे इतकीच महावितरण विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे रस्ता पूर्णत्वास जात असताना विद्युत खांब स्थलांतरणासाठी आणखी किती वेळ लागणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2022 रोजी प्रकाशित
राज्य मार्गावर अडथळय़ांची शर्यत; कल्याण-बदलापूर मार्गावर खोदकामानंतर विद्युत खांबांचा अडथळा, अपघातांत वाढ
कल्याण ते बदलापूर हा अंबरनाथ, उल्हासनगरमार्गे जाणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग पूर्णत्वास जात असला तरी या मार्गावरची अडथळय़ांची शर्यत संपताना दिसत नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-04-2022 at 00:37 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstacle race state highways obstruction power poles excavation kalyan badlapur road increase accidents amy