जुन्या नोटांच्या बदल्यात कमिशनवर नवीन नोटा देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला. यात सहा जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चलनातून बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल एक कोटींची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सुरेश तुकाराम झोंडगे (बदलापूर), मलकान नथू पवार (बदलापूर), उत्तम काशिनाथ पाटील (ठाणे), नरेश अनिल कुलकर्णी (कल्याण), मिल सुरेंद्र लुभाना (बदलापूर), अमोल अशोक शिंदे (पनवेल) यांना कासारवडवली पोलिसांनी सापळा रचून अटक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नोटा बाजारात आणून त्याऐवजी नवीन नोटा कमिशनवर बदलून देण्याच्या उद्देशाने काहीजण हावरे सिटी हौसिंग सोसायटी, घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एका झायलो गाडीतून सहा जण हावरे गेटसमोर उतरले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. साध्या वेशातील पोलीस असल्याचे लक्षात आल्यानंतर गाडीतून उतरलेल्या सहाजणांनी याच गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.