कल्याणमधील वाडेघर येथील एका जमीन मालकाच्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्याऐवजी अन्य व्यक्तींची नावे लावल्याने विकासक, वास्तुविशारद आणि उप जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दीड वर्षांपूर्वी या जमीन फसवणूकप्रकरणी वारसदार अंजुम खान, श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने उल्हासनगरचे उप जिल्हाधिकारी कोष्टी यांना दिले होते.
राजकोटवाला हे वाडेघर येथील जमिनीचे मूळ मालक होते. त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या वारसांची नावे जमिनीवर वारसदार म्हणून लागण्याऐवजी अन्य वारसदार जमिनीवर मालक असल्याचे राजकोटवाला यांच्या वारसांच्या निदर्शनास आले.   
कुलमुखत्यार पत्राच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेने राजकोटवाला यांच्या जमिनीवर दोन वेळा टीडीआर दिला आहे. याप्रकरणी पालिकेतील दोषी अधिकाऱ्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे घाणेकर यांनी सांगितले. बोगस वारसदार दाखल तक्रारीची नगरविकास विभागाने दखल घेतली होती. चौकशी अधिकाऱ्यांचे अहवाल तसेच सुनावण्यांमधील म्हणणे ऐकून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.