विचित्र अपघातात प्रवाशाचा मृत्यू

अंबरनाथ : मंगळवारी मध्यरात्री डाऊन दिशेच्या रेल्वेमार्गावर उल्हासनगरजवळ घडलेल्या एका विचित्र अपघातात रेल्वे प्रवाशाचे धड उल्हासनगर स्थानकाजवळ, तर त्याचे शिर अंबरनाथ लोकलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. हा प्रवासी डोंबिवलीहून रात्री साडेअकराच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये शिरला. उल्हासनगर स्थानकापुढे दरवाजातून डोकावताना विजेच्या खांबांना धडक लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. यात ३८ वर्षीय नरेंद्र रामचंद्र राजभर यांचा मृत्यू झाला आहे.

कल्याणच्या लोहमार्ग पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि. डी. शार्दूल यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील आयरे गावात राहणारे ३८ वर्षीय नरेंद्र रामचंद्र राजभर हे साडेअकराच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून रेल्वेने अंबरनाथकडे निघाले होते. उल्हासनगर स्थानकात लोकल आल्यानंतर नरेंद्र काही सेकंदांसाठी लोकलमधून बाहेर पडले आणि पुन्हा लोकलमध्ये शिरले. पुढे अंबरनाथच्या दिशेने लोकल जाताना लोकलबाहेर डोकावल्याने विजेचा खांब क्रमांक ५७ / ३८ ला त्यांची जोरदार धडक बसली. धडक इतकी गंभीर होती की, या अपघातात त्यांचे धड वजन असल्याने रेल्वेतून रुळालगत पडले असावे असा अंदाज लोहमार्ग पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि. शार्दूल यांनी व्यक्त केला. धक्कादायक म्हणजे धडक लागल्यानंतर या प्रवाशाचे शिर पुन्हा लोकलमध्ये पडले. ही लोकल अंबरनाथमध्ये सायडिंगच्या रुळावर जाऊन थांबली. सकाळी ही लोकल निघाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.