scorecardresearch

वातानुकूलित लोकल फेऱ्यांविरोधात प्रवासी पुन्हा आक्रमक ; कळव्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्धार

वातानुकूलित गाडय़ांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यांसारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झाले

वातानुकूलित लोकल फेऱ्यांविरोधात प्रवासी पुन्हा आक्रमक ; कळव्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्धार

ठाणे : साध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला  विरोध करतानाच आगामी काळात या मुद्दय़ावर मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा रविवारी कळवा येथे  प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आला. वातानुकूलित गाडय़ांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यांसारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झाले. ते उत्स्फूर्त होते. आठ-दहा वातानुकूलित लोकल गाडय़ा बंद करून हा प्रश्न मिटला आहे, असा समज प्रशासनाने करून घेऊ नये. साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरून चालत जाऊ, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेवरील गर्दीच्या वेळेतील आणि प्रवाशांच्या सोयीच्या असणाऱ्या काही साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी मागील आठवडय़ात कळवा कारशेड येथून सुटणारी वातानुकूलित लोकल थांबवत आंदोलन केले होते. तर, बदलापूर रेल्वे स्थानकातदेखील प्रवाशांनी सलग तीन दिवस स्थानकात घोषणाबाजी केली. यानंतर यापैकी काही लोकल गाडय़ा रद्द करत पुन्हा साध्या गाडय़ा सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी या प्रश्नावर प्रवाशांच्या भावना तीव्र आहेत. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कळवा येथील कावेरी सेतू येथे जमण्याचे आवाहन  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. या आवाहानाला प्रतिसाद देत शेकडोंच्या संख्येने प्रवासी रविवारी येथे जमले होते.    दरम्यान, कळवा स्थानकाहून पारसिक बोगदा ओलांडताना एक्स्प्रेसच्या भोंग्याचा आवाज हा १७५ डेसिबल्स इतका असतो. या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले. 

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers again aggressive against air conditioned local train zws

ताज्या बातम्या