ठाणे येथील पाचपाखाडी भागातील बापट रुग्णालयात उपचारादरम्यान सचिन पवार (२६) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सचिनचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील पेण येथे राहणाऱ्या सचिनला मुतखडा झाल्याने दहा दिवसांपूर्वी पाचपाखाडी येथील बापट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यानंतर त्याला घरी सोडताना आणखी एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल, असेही त्याला सांगण्यात आले होते. मात्र, तीनदा वेळ मागूनही सचिनला शस्त्रक्रियेसाठी वेळ मिळाली नाही. अखेर सोमवारी त्याला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील एका परिचारिकेने त्याला इंजेक्शन दिले. परंतु, त्यानंतर काही वेळातच सचिनचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत इंजेक्शन देण्यात आल्याने सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient died because careless doctor
First published on: 06-10-2015 at 00:48 IST