दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.

हैदराबाद येथे तुळईच्या सांध्याच्या सुटय़ा भागांचे काम करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी हे सांधे पत्रीपूलाच्या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यांची जोडणी करून पूर्ण आकाराची तुळई तयार करण्याचे काम  सुरू होते. तांत्रिक कौशल्यांचा वापर करून अवजड तुळई जागेवरून हलविण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. ७६.६३ मीटर लांबीची तुळई आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता कल्याण-डोंबिवली दरम्यानची उपनगरीय रेल्वे वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर तुळई ढकलण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत ४२ मीटर तुळई पुढे ढकलण्यात आली, तर उर्वरित ३६ मीटरची तुळई रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये पुढे ढकलण्यात येणार होती. रविवारी सकाळी ९.५० ते १.५० मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र मेगाब्लॉकला सुरुवात होण्यापूर्वीच दादर येथे कल्याणमार्गे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. इंजिन दुरुस्त करून ही गाडी पुढे जाईपर्यंत मेगाब्लॉक अर्धा तास पुढे ढकलण्यात आला. अर्धा तास काम थांबल्याने ठरविलेल्या वेळेत तुळईचा उर्वरित ३६ मीटरचा अवजड भाग पुढे ढकलणे अवघड होते. त्यामुळे ३६ पैकी १८ मीटरचा भाग अडीच तासाच्या कालावधीत पुढे ढकलण्यात आला. १६ मीटरचा भाग सोमवारी रात्रीच्या वेळेत मेगाब्लॉक घेऊन पुढे ढकलण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे कौशल्यपूर्ण काम योग्यरीतीने होण्यासाठी महामंडळाचे ५०हून अधिक  अभियंते, इतर ५० अधिकारी घटनास्थळी  होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हेही शनिवारी उपस्थित होते. रविवारी सकाळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, साहाय्यक विभागीय व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुख्य पूल अभियंता एस. एस. केडिया, वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग उपस्थित होते.

पुलाचे काम मार्गी लागावे म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील होतो. अखेर त्या प्रयत्नांना तुळई बसविण्याचे काम सुरू झाल्यानंतर यश आले आहे. प्रवाशांना दिलेल्या शब्दाप्रमाणे डिसेंबर अखेपर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन नवीन वर्षांत पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे खा. शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवली ते टिटवाळा २० हजार प्रवाशांची वाहतूक

पत्रीपुलावर तुळई बसविण्याचे काम शनिवारी, रविवारी हाती घेण्यात आले होते. या दोन दिवसांच्या काळात मध्य रेल्वेच्या कल्याण-डोंबिवली दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीच्या विशेष बस फेऱ्या या भागात चालविण्यात आल्या. या दोन दिवसांत केडीएमटी बसमधून २० हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली आहे.

पत्रीपुलावरील तुळई बसविणे. तेथील तांत्रिक कामे पूर्ण करून पूल डिसेंबरअखेपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. तुळई बसविण्याच्या कामासाठी १०० अभियंते, कामगार काम करीत आहेत.

– शशिकांत सोनटक्के, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी

आठ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये ही अवजड तुळई पुलावर ठेवणे आव्हानात्मक होते. या कामासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरी, लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्या. तुळईचा उर्वरित भाग रात्रीचा मेगाब्लॉक घेऊन बसविण्यात येईल.

– शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patri pool open for traffic in january abn
First published on: 23-11-2020 at 00:06 IST