सॅटिसखालील पुलाखाली कायमस्वरूपी वाहतूक पोलीस चौकी

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या सॅटिस पुलाखाली अधिकृत रिक्षा थांबा असताना मनमानी पद्धतीने कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे वसूल करणाऱ्या रिक्षाचालकांना आवरण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता या ठिकाणी कायमस्वरूपी चौकी उभारली आहे. येत्या काही दिवसांत ही चौकी सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही निगराणी ठेवण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकातील पश्चिमेला काही वर्षांपूर्वी स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तसेच महिला सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या जागेचे कारण देत २०१७ मध्ये ही पोलीस चौकी हलवून ती पुन्हा कोर्ट नाका येथील पोलीस आयुक्तालय कार्यालयाजवळ नेण्यात आली होती. यानंतर स्थानक परिसरात काही बेशिस्त रिक्षाचालकांची मोठय़ा प्रमाणात मुजोरी वाढली. अनेकदा हे रिक्षाचालक थेट फलाटवर उभे राहून ठाणे स्थानकात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून जादा प्रवासभाडे आकारत असल्याचे चित्र आहे. तर काही शेअरिंग रिक्षाचालकांकडून सॅटिस पूल आणि आलोक हॉटेल येथे बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करण्यात येतात. यामुळे ठाणे स्थानकात ये-जा करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. या संदर्भात वाहतूक पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. यासंबंधी काही दिवसांपूर्वीच खासदार राजन विचारे यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासोबत दौरा करून येथे वाहतूक चौकी उभारण्याची सूचना दिली होती. त्यानंतर वाहतूक शाखेने ठाणे महापालिकेला चौकी उभारून देण्याचे पत्रही पाठविले होते. या पत्राची दखल घेत ठाणे महापालिकेने पूर्वी ज्या ठिकाणी चौकी होती, त्याच ठिकाणी नव्याने चौकी उभारली आहे. या चौकीच्या आतील भागाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच ती खुली होणार आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी काही पत्रके छापली असून त्याचे वाटप करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी दिलेल्या क्रमांकांवर प्रवाशांनी संपर्क साधण्याचे आवाहन या पत्रकांतून करण्यात आले आहे.

सॅटिसखालील पोलीस चौकीमध्ये ‘वायरलेस’ यंत्रणा असणार आहे. याद्वारे चौकीतील पोलीस कर्मचारी सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतील. रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आलोक हॉटेल, सॅटिस पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणीही पोलिसांची गस्त असणार आहे.

कवयित्री गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर वाहतूक शाखा.

 

हेल्पलाइन क्रमांक

८२८६ ३०० ३००

८२८६ ४०० ४००

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

७०३९० ०२८६६