scorecardresearch

ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढीग; पालकमंत्र्यांच्या दट्टय़ानंतर प्रशासनाची तारांबळ

ठाणे शहरातील समस्यांचे निराकरण आणि प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्यासह महापालिकेतील अधिकारी दररोज फिरत आहेत.

ठाणे : ठाणे शहरातील समस्यांचे निराकरण आणि प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्यासह महापालिकेतील अधिकारी दररोज फिरत आहेत. असे असले तरी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने स्वच्छतेच्या आघाडीवर पुन्हा एकदा हे शहर पिछाडीवर पडू लागले आहे.
ठाणे शहराचा केंद्रिबदू ठरलेल्या नौपाडय़ापासून वागळे इस्टेट, कोपरी, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा अशा सर्वच विभागांमधील कचऱ्याची वाहतूक अनियमित होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मात्र, प्रशासनाने नागरिक दुपारनंतर कचराफेक करत असल्याने घाण साचत असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दट्टय़ानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली असून दिवसभरात तीन वेळा कचरा उचलण्याचे नवे नियोजन घनकचरा विभागामार्फत केले जात आहे.
ठाणे शहर स्वच्छ, सुंदर दिसावे यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटींपेक्षा अधिक निधीचा विनियोग करत सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कमालीचे आग्रही असून ठाणे जिल्ह्यातील सुंदर शहरांमध्ये ठाण्याने आघाडी घ्यावी यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे शहर सुशोभीकरणासाठी कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पाची आखणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात कचरा सफाई यंत्रणेची दैना उडाल्याने महापालिका प्रशासन टीकेचे लक्ष्य ठरू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून याविषयी तातडीने उपाय आखण्याऐवजी प्रशासन नागरिकांनाच दोष देण्यात पुढे आहेत.
प्रस्ताव काय?
* पालकमंत्र्यांच्या दट्टय़ानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घनकचरा विभागाच्या माध्यमातून रस्ते कचरामुक्त करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
• ठाणे महापालिका घनकचरा विभागाकडे मोठय़ा ११० तर छोटय़ा ७७ घंटागाडय़ा आहेत. याशिवाय, २८ कॉम्पेक्टर वाहने आहेत. या वाहनांवर सुमारे ४०० कामगार काम करतात.
• पालिका आता ५० छोटय़ा घंटागाडय़ा घेणार असून त्याचबरोबर घरोघरी कचरा जमा करण्यासाठी कचरा वेचक नेमणार आहेत. हे कचरा वेचक कचरा गोळा करून छोटय़ा घंटागाडीमध्ये तो टाकणार आहेत.
• सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन वेळांत कचरा उचलण्याचे काम केले जाणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी ३०० कुटुंबांमागे एक कर्मचारी नेमला जाणार आहे, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव आहे.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर जाग
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी भागाचा नुकताच दौरा केला. त्या दरम्यान महापालिकेने कचरा टाकण्यासाठी ठरवून दिलेल्या भागात शिंदे यांना कचऱ्याचे ढीग दिसून आले. यानंतर त्यांनी प्रशासनाला घंटागाडय़ांची संख्या आणि फेऱ्या वाढवा, कचरा टाकण्यासाठी ठरवलेली ठिकाणे बंद करा आणि नागरिकांकडून रस्त्यावर कचरा फेकला जाऊ नये यासाठी यंत्रणा उभी करा असे निर्देश दिले.
कचरा का साचतो?
घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्याचे काम दुपारी १.३० वाजेपर्यंत तर, कॉम्पेक्टरद्वारे कचरा उचलण्याचे काम दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असते. घंटागाडी परिसरात कचरा गोळा करण्यासाठी जाते, त्या वेळेस आतील भागात राहणाऱ्या काही नागरिकांना गाडी आल्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे ते कचरा टाकण्यासाठी येत नाहीत. असे नागरिक पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी कचरा टाकतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Piles rubbish everywhere thane administration cable guardian minister insistence amy

ताज्या बातम्या