प्रजासत्ताक दिन संचलनात लेझीमचा नाद घुमणार!

महाराष्ट्राच्या पथकात ठाणे जिल्ह्यतील नऊ मुलींचा समावेश

महाराष्ट्राच्या पथकात ठाणे जिल्ह्यतील नऊ मुलींचा समावेश
व्यायाम आणिमनोरंजन यांची उत्तम सांगड असलेला लेझीम हा खास महाराष्ट्रीय समूह नृत्यप्रकार आता देशभर लोकप्रिय आहे. यंदा नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात लेझीमचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रातील ३६ मुले त्यात भाग घेत असून त्यातील नऊ मुली ठाणे जिल्ह्य़ातील आहेत.
यंदाच्या संचलनाची सुरुवात महाराष्ट्राचे लेझीम, पंजाबचा भांगडा आणि आसामचे बिहु या नृत्यांनी होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थी या समूह लेझीम नृत्यात सहभागी होणार आहेत. मात्र त्यातील सर्वाधिक नऊ मुली ठाणे जिल्ह्य़ातील आहेत.
मुंबई येथे राष्ट्रीय छात्र सेना दिन साजरा झाला होता. त्यात अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले होते. यातील काही निवडक विद्यार्थ्यांना दिल्ली येथील संचलनात सहभागी होण्यासंबंधी पत्र आले. बिर्ला महाविद्यालयातील निकिता जंगम, मनीषा खोळंबे, अग्रवाल महाविद्यालयातील भाग्यश्री भोसले, सबुरी पांचाळ, उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयातील निकिता कदम, कल्याणी मोरे, ठाण्यामधील ज्ञानसाधना महाविद्यालयातील सुवर्णा सरकटे, हर्षदा भोईर तर जोशी बेडेकर महाविद्यालयातील लक्ष्मी आणेकर यांचा समावेश आहे. खास मराठमोळ्या वेशात ही मुले लेझीममधील विविध प्रकार सादर करणार आहेत. या मुलांना प्रथम नाशिक येथे काही दिवस समाधान शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर १६ जानेवारीला ही मुले दिल्ली येथे रवाना झाली आहेत.
संचलनानिमित्त आम्ही नवी दिल्लीत प्रथमच आलो आहोत. इतक्या मोठय़ा मानाच्या सोहळ्यात सादरीकरणे करायची संधी मिळणे हा आमच्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे, अशी भावना मनीषा खोळंबे हिने व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांसमोर कलेचे सादरीकरण करण्याची संधी हा दुर्लभ योग आहे, अशी प्रतिक्रिया भाग्यश्री भोसले हिने व्यक्त केली.
‘जय मल्हार’चा येळकोटही
सध्या सुरू असलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेच्या शीर्षक गीतातील धूनही दिल्ली येथील संचलनातही वाजविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध लोककलांचा परिचय समूह नृत्याद्वारे करून देण्यात येईल. त्यातील एक गाणे खंडोबा या दैवताविषयी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Play lezim dance on republic day celebration

ताज्या बातम्या