‘जागर मराठीचा’मध्ये कवी बागवे यांचे उद्गार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : ‘कवितेचे झाड विविध प्रकारच्या फळांचा रस देणारे पृथ्वीवरचे एकमेव झाड आहे. जे काव्य रसिकांच्या प्रेमाने वाढते व बहरते,’ असे विचार ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा दिनानिमित्त वसईत साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. साहित्य कला लिहिणाऱ्यांना व वाचणाऱ्यांना आत्मबळ देते, शुद्ध आनंद देते आणि खरी भाषा ती, जी नाळेशी जुळलेली असते. म्हणूनच शब्दांनाही मायेची उब असते, असे त्यांनी सांगितले. डॉ.भाईडकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या सात भावंडांचा गरिबीत पालनपोषण करताना आईने केलेल्या त्यागाची, कर्तृत्वाची, करारीपणाची महती सांगितली. डॉ.सिसिलिया काव्‍‌र्हालो यांनी कवी कुसुमाग्रजांच्या साहित्यसंपदेवर प्रकाश टाकणारे विचार मांडले.

यावेळी बहुविध सादरीकरणाने या कार्यक्रमात चांगलीच रंगत भरली. कवी- कवयित्री सुषमा राऊत, प्रकाश पाटील, पुष्पा जाधव, पिराजी जाधव, जयंत देसले, डॉ.सुरेखा धनावडे,ज्योती बालिगा- राव (गझल) प्रा.डॉ. सखाराम डाखोरे, अ‍ॅड.रमाकांत वाघचौडे (नाटय़ अभिवाचन) संगीता आरबुने (लघु कथा) सुरेखा कुरकुरे, मंगल मांजरेकर, अश्विनी भोईर, स्वाती जोशी, मकरंद सावे, सुरेश ठाकूर (नाटय़ संगीत) संदेश जाधव (भक्तिगीत) यांनी सादरीकरण केले.

यावेळी साहित्यिक अशोक भाईडकर यांच्या ‘आवस’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे पदाधिकारी अशोक मुळ्ये, डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, ज्येष्ठ साहित्यिक कवी भगवान निळे, मंगेश विश्वासराव, पत्रकार अ‍ॅड.सुरेश कामत, पदाधिकारी प्रकाश वनमाळी हे मान्यवरही या मराठी भाषा गौरव सोहळ्यात सहभागी झाले होते. मकरंद सावे आणि स्वाती जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संदेश जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.