मद्यपाटर्य़ावर र्निबध; वाहनांची काटेकोर तपासणी; ७० पोलीस तैनात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या ठाण्यातील येऊरच्या जंगलात मद्य पर्यटकांना रोखण्यासाठी यंदाही ठाणे पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. येऊर परिसरातील बंगल्यांमध्ये होणाऱ्या पाटर्य़ाना बंदी घालणाऱ्या नोटिसा बंगलेधारकांना आधीच पाठवण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. येऊरचे प्रवेशद्वार, उपवन परिसरात नाकाबंदी करण्यासाठी तब्बल ७० पोलिसांचा ताफा या भागात तैनात करण्यात आला असून विनापरवानाधारक मद्य बाळगणे, येऊर परिसरात वाहनांमध्ये संगीत लावणे, वेगाने दुचाकी चालवणे अशा कृत्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नवीन वर्षांचे स्वागत निसर्गाच्या सान्निध्यात करण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी ३१ डिसेंबरला येऊरकडे मोर्चा वळवितात. मद्यप्राशन करणे, बंगल्यावर पाटर्य़ा करणे, मोठय़ा आवाजात संगीत लावणे यामुळे गेल्या काही वर्षांत येऊरमध्ये नववर्ष स्वागताच्या रात्री धिंगाणा असतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊरच्या जंगलातील प्राण्यांना या धांगडिधग्याचा त्रास होत असतो. त्यामुळे येथे शांतताभंग करणाऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी निसर्गप्रेमींकडून सातत्याने होत असते. ठाणे पोलिसांनी यंदा प्रथमच येऊरच्या बंगल्यांवर पाटर्य़ा करण्यासाठी बंदी असल्याच्या सूचना येथील बंगले मालक आणि हॉटेल मालकांना दिल्या आहेत. त्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. असे असले तरी नववर्षांच्या स्वागतासाठी येऊर, उपवन परिसरातदेखील तरुण मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करण्याचे प्रकार वाढतात. यासाठी गुरुवारी सायंकाळपासून येऊर प्रवेशद्वार, उपवन परिसरात पोलिसांकडून गस्त सुरू करण्यात आली आहे. पोलीस, वन विभाग यासोबतच येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचा सहभाग या कारवाईच्या ठिकाणी असणार आहे. ३० आणि ३१ डिसेंबर रोजी ही गस्त अधिक कडक करण्यात येणार आहे. येऊरच्या प्रवेशद्वारावरच नाकाबंदी करण्यात आली असून येऊरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पोलिसांतर्फे कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी या परिसरात ७० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरला येऊरमध्ये ठिकठिकाणी सायंकाळी सहापासून पहाटेपर्यंत उपवन, येऊर, शास्त्रीनगर, समतानगर, भीमनगर या ठिकाणी असलेल्या बारमुळे पर्यटक, तरुणांचा घोळका असतो. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची चार वाहने या परिसरात सायंकाळपासून गस्तीसाठी फिरणार आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असून मद्यप्राशन करून वाहन चालणाऱ्या नागरिकांवर आणि अमली पदार्थ आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

प्रदीप गिरीधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police checking in yeoor new year celebration thane yeoor
First published on: 29-12-2017 at 03:37 IST