नालासोपाऱ्यातील उघडय़ा नाल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका; महापालिकेचे दुर्लक्ष
नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे येथील शाळेच्या बाजूला असलेला ९० फुटी नाला उघडा असल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळेतील विद्यार्थी घरी जाताना आणि शाळेत येताना हा नाला ओलांडून येतात. नाल्यावर कठडाविरहित पूल आहे, रस्ताही नाल्याच्या बाजूनेच असल्याने विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. शाळेने वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने हा नाला बंदिस्त केला नाही, असा आरोप शाळेकडून करण्यात आला आहे.
नालासोपारा येथील निळेमोरे येथे आर. के. पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या शाळेच्या जवळून हिरावती पॅलेस आणि आदिराज बिल्डिंग या इमारतींलगत मोठा नाला जातो. शाळेत येण्यासाठी शाळकरी मुलांना हा नाला ओलांडावा लागतो. हा ९० फुटी नाला उघडा आहे. शाळकरी मुले अगदी नाल्याजवळून जात असल्याने ते नाल्यात पडून दुर्घटना होण्याची मोठी शक्यता आहे.
शाळेने याबाबत वारंवार महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्यापही हा नाला बंदिस्त करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात हा नाला दुथडी भरून वाहत असतो. त्यावेळी तर स्थिती अधिकच धोकादायक बनते, असे या शाळेच्या मुख्याध्यापिका शेषा सिंग यांनी सांगितले. आम्ही शाळकरी मुले नाल्याजवळून जाताना किती धोकादायक परिस्थिती असते, अशा चित्रफितीही सादर केल्या, मात्र पालिका काही करत नाही, असे त्या म्हणाल्या.
भाजपच्या वसई-विरार महिला मोर्चाच्या सचिव रिता पांडेय यांनीही महापालिकेच्या हलगर्जीबद्दल संताप व्यक्त केला आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होईल आणि पावसाळा सुरू होईल. पालिका कुठली दुर्घटना होण्याची वाट बघतेय का, असा सवाल त्यांनी केला. या ठिकाणी असलेले पदपथ बंद असतात. अंधारात नागरिकही नाल्यात पडून दुर्घटना होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने मागील महिन्यात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सर्व गटारांवरील झाकणे बसवणे, धोकादायक नाले बंदिस्त करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही नाला बंदिस्त करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत, पण पालिका दाद देत नाही. – शेषा सिंग, मुख्याध्यापिका, आर. के. पब्लिक स्कूल