महावितरणच्या अतिरिक्त अभियंत्यांचा दावा
बदलापूर पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबता थांबत नसताना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हा प्रश्न कायम निकालात काढू असा दावा केला आहे. पूर्व भागात येणाऱ्या मुख्य विद्युतवाहिनीवरील कंडक्टर बदलले जात असून हे काम पूर्ण होताच परिस्थिती सुधारेल, असा दावा केला जात आहे. कात्रप परिसरातील नव्या ट्रान्सफॉर्मरच्या जागेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे एका ट्रान्सफॉर्मरवर येणारा भार कमी होणार आहे. येत्या काही काळात पूर्व भागातील विजेचा प्रश्न संपुष्टात येईल, असा दावा येथील अतिरिक्त अभियंता अशोक ईश्वरे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केला आहे.
बदलापूर शहरातील पूर्व भागात गेल्या वर्षभरापासून वेळी-अवेळी वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. ऐन दिवाळीत नरक चतुदर्शी ते पाडव्यापर्यंत तब्बल तीन दिवस सहा तासापेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्वेकडील नागरिक हैराण झाले होते. त्यावर कळस म्हणून पुन्हा १४ नोव्हेंबरला दिवसभर वीज गेली होती.
हा प्रश्न कधी सुटणार, यावर बोलताना पूर्वेचे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी मुख्य विद्युतवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे सांगितले. बदलापूर पूर्वेला अंबरनाथ-बदलापूर हद्दीवरील मोरिवली येथून मुख्य विद्युतवाहिनी येते. नेमके या वाहिनीवरील कंडक्टर जुने असल्याने ते बदलावे लागणार आहेत. संपूर्ण वाहिनीवरील हे कंडक्टर बदलण्यात येणार असून, यापैकी ७ कंडक्टर हे शनिवारी बदलण्यात आले असून येत्या शुक्रवारी पुन्हा वीजप्रवाह खंडित करून उर्वरित १९ कंडक्टर बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्य वाहिनीवरील खराब कंडक्टरमुळे होणारा त्रास संपुष्टात येईल. तसेच, कात्रप सूर्यानगर भागात छोटय़ा विद्युत तारेवरील ५ कंडक्टर बदलण्यात आले असून येथे उभ्या करावयाच्या ट्रान्सफॉर्मरचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू, असा दावा बदलापूर पूर्वचे अतिरिक्त अभियंता अशोक ईश्वरे यांनी लोकसत्ता ठाणेशी बोलताना केला आहे.
* शनिवारी ७ कंडक्टर बदलले
* येत्या शुक्रवारी वीज बंद
* १९ कंडक्टर बदलणार
जुनाट यंत्रणा
बदलापूर शहरातील वीज वितरणाची यंत्रणा ही जुनी असल्याने वारंवार विद्युतवाहिन्या तुटणे, कंडक्टर खराब होणे, ट्रान्सफॉर्मर जळणे असले प्रकार होत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या जुनाट व्यवस्थेचे भोग मात्र सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या माथी आले आहेत.