ठाण्यात रिक्षांमध्ये महिला सुरक्षित नाहीत, अशी भावना नागरिकांच्या मनात मध्यंतरी घडलेल्या तरुणींसंदर्भातील घटनांवरून घट्ट झाली होती. म्हणूनच ही भीती नाहीशी करून सुरक्षित आणि योग्य प्रवासी भाडे आकारणाऱ्या ‘प्रीपेड रिक्षा’ची मुहूर्तमेढ ठाण्यात रोवली जाणार आहे. १ मेपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे. विजू नाटेकर रिक्षा युनियनने आपल्या सदस्यांमार्फत प्रीपेड रिक्षा चालविण्यास संमती दर्शवली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रीपेड रिक्षांचा थांबा उभारला जाणार आहे. प्रवाशांना या माध्यमातून ज्या ठिकाणी जायचे असेल त्या ठिकाणचे पैसे भरून या थांब्यावर प्रवाशांना रीतसर प्रवास पावती दिली जाणार आहे. पावतीवर संबंधित रिक्षाचालकाची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याने महिलांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे.
ठाण्यातील स्वप्नाली लाड या तरुणीच्या बाबतीत सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर रिक्षाप्रवास महिलांसाठी जोखमीचा ठरला होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी प्रीपेड रिक्षा योजना राबविण्याची संकल्पना मांडली होती. तसेच या योजनेसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. याच काळात रत्नागिरीहून एका कार्यक्रमानिमित्ताने दोघी तरुणी ठाण्यात आल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत होत्या. त्या वेळी रिक्षाचालकाचे अश्लील हावभाव पाहून दोघींनी स्वत:च्या बचावकरिता चालत्या रिक्षातून उडय़ा घेतल्या होत्या. या घटनेनंतर पुन्हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येताच प्रीपेड रिक्षांच्या प्रस्ताव मंजूर प्रक्रियेला पुन्हा वेग आला.
त्यानुसार, या प्रस्तावास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून ही योजना राबविण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

योजना काय?
ग्राहकांनी प्रीपेड रिक्षाच्या बूथवर ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या भागाचा पत्ता सांगायचा. त्यानुसार बूथमधील लिपिक त्या ठिकाणाचे अंतर तपासून त्याप्रमाणे भाडय़ाची रक्कम घेतील आणि प्रवाशांना एक प्रवास पावती देतील. रिक्षाचालक आणि प्रवाशांचे नाव आणि त्यांचे मोबाइल क्रमांक तसेच रिक्षाचा क्रमांकही असणार आहे. बूथवर घेतलेल्या पावतीद्वारे रिक्षाचालक प्रवाशांना ठरलेल्या ठिकाणी नेऊन सोडणार आहे; तसेच बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती विजू नाटेकर युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांनी दिली.

जादा भाडय़ाला लगाम..
या योजनेमुळे ज्या रिक्षातून प्रवासी प्रवास करीत आहेत, त्या रिक्षाची माहिती नोंद असणार आहे. प्रीपेड रिक्षाकरिता किलोमीटरनुसार दर ठरविण्यात आले असून या दराप्रमाणेच प्रवाशांना पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे जादा भाडे आकारण्याच्या प्रकारांनाही या योजनेमुळे आळा बसणार आहे, अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेच्या जकात विभागाच्या कार्यालयात प्रीपेड रिक्षा बूथ उभारण्यात येणार असून या योजनेकरिता महापालिकेने ही जागा देऊ केली आहे. शहरात सुमारे १० ते १२ रिक्षा युनियन्स आहेत. मात्र, त्यापैकी केवळ विजू नाटेकर रिक्षा युनियनने ही योजना राबविण्यास पुढाकार घेतला आहे.

नीलेश पानमंद, ठाणे