अंबरनाथ मुख्याधिकाऱ्यांचे रुग्णालयांना आवाहन

अंबरनाथ : राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रेमडेसिविर इंजेक्शनच्या वितरणाची व्यवस्था निर्माण केली असून खासगी डॉक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शनची चिठ्ठी रुग्णांच्या नातेवाईकांना न देण्याचा आदेश काढला आहे. बाजारात हे इंजेक्शन मिळणे दुरापास्त असून त्याचा पुरवठा शासनामार्फत होत असल्याचेही पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोविड दर्जा असलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याचा फायदा करोनाबाधितांना होतो आहे. मात्र या रुग्णांना रेमडेसिविर देण्यात रुग्णालय प्रशासनाला अडचणी येत आहेत. १२ एप्रिलनंतर ठाणे जिल्ह्यातील रेमडेसिविरचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जाऊ  लागले आहे. त्यापूर्वी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार वाढल्याने राज्य शासनाला याबाबतचे आदेश काढून ही यंत्रणा जिल्हा प्रशासनाला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत खासगी आणि शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर दिले जाते आहे.

रुग्णालयांनी मागणी करून रेमडेसिविर मिळवायचे आहेत. मात्र अनेकदा मागणीपेक्षा कमी प्रमाणात रेमडेसिविर मिळत असल्याने रुग्णाचे नातेवाईक बाहेरून रेमडेसिविर मिळवण्यासाठी धावाधाव करतात. त्यामुळे काळाबाजारातून चढय़ा दराने रेमडेसिविर मिळवण्याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांकडे पर्याय नसतो. पालिका संचलित रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारे रेमडेसिविरसाठी डॉक्टरांनी चिठ्ठी दिल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामुळे आदेशानंतरही रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र होते.

याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी शहरातील खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना अशाप्रकारे रेमडेसिविर मिळवण्यासाठी चिठ्ठी न देण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वानी शासनाच्या अधिकृत प्रक्रियेतूनच रेमडेसिविरची मागणी करावी असेही रसाळ यांनी सांगितले आहे.

रुग्णांची लूट थांबवा

शहरातल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांची आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहे. संकटकाळात माणुसकी दाखवा असे आवाहन आर्थिक लूट न थांबवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिला आहे. नुकतीच पालिकेत खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत असा इशारा डॉ. किणीकर यांनी दिला.