डोंबिवली – वारंवार स्मरण पत्रे पाठवूनही नियमित आणि थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केल्या. या थकबाकीदारांकडे एकूण एक कोटी २५ लाखांची थकबाकी आहे. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एकूण ७१ लाख ७७ हजाराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सील केल्या, अशी माहिती ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिली.
या कारवाईत भागशाळा मैदानाजवळील सत्या सभागृह शेजारील प्रसाद बार आणि रेस्टाॅरंट हे एका माजी नगरसेवकाचे हाॅटेल, भाविन आर. पटेल या विकासकाने २७ लाखांचा कर भरणा न केल्याने त्याचे कार्यालय सील करण्यात आले. याशिवाय अनेक सोसायट्यांनी वेळेत कर भरणा न केल्याने त्या सोसायट्यांच्या पाणी जोडण्या तोडण्यात आल्या, अशी माहिती साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी दिली.
हेही वाचा – वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांची मोडतोड
आर्थिक वर्ष संपण्यास चार दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे साहाय्यक आयुक्त गुप्ते यांच्या पथकाने शुक्रवारी ह प्रभागातील थकबाकीदार सोसायट्या, विकासक, व्यापारी गाळे धारक यांच्या मालमत्ता सील केल्या.
राजाराम संकुल, कृष्णाई दर्शन, विघ्नहर्ता पार्क, तुळशी पुजा, शिव दर्शन, ओम हरी हरेश्वर, साई आनंद, गगनगिरी, धवनी या सोसायट्यांनी मालमत्ता कराचा भरणा केला नव्हता. या सोसायट्यांची पाणी जोडणी तोडण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने कर भरणा केला. ही कारवाई सुरूच राहणार आहे. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी केले आहे.
कल्याणमध्ये कारवाई
कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात भाडे पट्ट्याने गाळे घेणाऱ्या अनेक गाळेधारकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरणा केली नव्हती. त्यांना नियमित कर भरण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आर्थिक वर्षअखेर आली तरी गाळेधारक कर भरणा करत नसल्याने आयुक्तांच्या आदेशावरून मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सीमा आठवले, अधीक्षक भागाजी भांगरे यांच्या पथकाने नऊ गाळेधारकांचे गाळे सील केले. त्यांच्याकडे ५२ लाख ४९ हजारांची थकबाकी आहे.
हेही वाचा – डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस
“महापालिकेच्या मालकीच्या गाळे, स्टाॅलधारकांनी त्यांच्याकडील चालू आणि थकीत कर भरणा रक्कम तातडीने भरणा करावी. अन्यथा त्यांच्या मालमत्ता सील केल्या जातील. ही कठोर कारवाई कर भरणा होईपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार आहे.” असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे म्हणाल्या.