tvlogयेऊरचे घनदाट जंगल म्हणजे ठाण्याचे वैभव. शहराच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत येऊरचा मोठा वाटा आहे. ठाणेकरांना विपुल वनसंपत्ती, शुद्ध निरोगी हवा आणि सौंदर्य येऊरच्या जंगलाने बहाल केले आहे. मात्र काळाच्या ओघात या वनसंपत्तीचा ऱ्हास होत आहे. वाढत्या नागरीकरणाचा परिणाम या जंगलावर होत असून, निसर्गपूत्र आदिवासींची आणि या जंगलाची नाळ तुटत चालली आहे. वेळीच लक्ष घातले नाही, तर येऊरच्या डोंगराचे नुसते माथे शिल्लक राहतील, रान हरविलेले असेल.

खाडी, तलावपाळी आणि मामा-भाचा तथा येऊरचा डोंगर यांनी ठाणेकरांना विपुल धनसंपत्ती, शुद्ध निरोगी हवा आणि सौंदर्य बहाल केले, गेल्या दीड-दोन हजार वर्षांत ठाण्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत या तिघांचाही मोलाचा वाटा आहे. विशेषत: स्थितप्रज्ञ योगीप्रमाणे भासणाऱ्या येऊर डोंगराच्या अंतरंगात काय काय दडले असेल याचे लहानपणापासूनच मला कुतूहल वाटत आले आहे. जसजशी समज वाढत गेली तसतसे येऊरच्या डोंगराकडे माझे जाणे-येणे वाढू लागले.
येऊर गावाच्या पुढे पाटोळेपाडा आहे. या पाटोळेपाडय़ा जवळ ब्रिटिश काळातील दगडी बांधकाम केलेली गढीवजा चौकी (चेकपोस्ट) होती. त्यापुढे अर्धा कि. मी. अंतरावर दाट झाडीत जेम्स नावाच्या ब्रिटिश राजवटीतील पोलीस अधिकाऱ्याचा फार्म हाऊस होता. या फार्म हाऊसमध्ये त्याने डुकरे पाळली होती. त्यांच्यासाठी जाड फळय़ांची खुराडीही उभारली होती. कोलणाड, चरई भागांतील ख्रिश्चन लोक विशेष प्रसंगी येथे येऊन डुकरे खरेदी करत. हा इंग्रज माणूस सोडल्यास डॉ. पंडित, फडके आणि नाईक कुटुंब यांच्या पारंपरिक जमिनी तेथे होत्या. डॉ. पंडित यांचा पिंड समाजसेवेचा होता. त्यांनी तिथल्या आदिवासींना कपडे, भांडी आणि जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. १९७१ साली आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा काढली.
tv09येऊरच्या जंगलात वारली, कातकरी, ठाकर या आदिवासी जमातींचा वावर इतिहास काळापासून येथे आहे. दहा-बारा खोपटांची एकमेकांच्या हाकेच्या अंतरावर असणारी पुंडक्यासारखी वीरळ वस्ती येऊरपासून पोटोळेपाडय़ापर्यंत होती. उपजीविकेसाठी कंदमुळे, मध, शिकार तर ऋतूप्रमाणे येणारी रानभाजी शेवळं, कंटोळी, भारंगी, कुडा टाकला, तर फळांमध्ये रायवळ आंबे, फणस, करवंदे, काजू, जांभळे, तोरण, आळू, भोकर इत्यादी येऊरच्या जंगलात मुबलक प्रमाणात होत असल्यामुळे आदिवासी स्त्री-पुरुष ती विकण्यासाठी खाली ठाणे नगरात येत.
मला आठवते १९५५-६० च्या सुमारास ठाण्यातील पक्क्य़ा घरात राहणाऱ्या लोकांकडे स्टोव्ह जरी असले तरी गरम पाणी करण्यासाठी तांब्याच्या बंबाला जळणासाठी लाकूडफाटा लागत असे. सर्वसामान्यांच्या आणि कुडा-मेठीच्या घरात शेगडी वा चुली असत, त्यांना लाकूड फाटा लागे, आदिवासी बाया-बापे डोक्यावरून लाकडाची मोळी घेऊन डोंगर उतरून ठाण्यात येत. टेकडी बंगला, आगरा रोडच्या पश्चिमेला पाचपाखाडी, चंदनवाडी, खोपट, नारोळीपाडा या भागात बहुसंख्य कुडामेंढीचीच घरे होती, घर शाकारणीला कारवी, बांबू, बांबूच्या चिंबाटी (पट्टय़ा)चे भारे बांधून, तोल सावरत मोठय़ा कष्टाने आदिवासी ती घरमालकाला आणून देत, आदिवासींच्या श्रमाला किंमत नव्हती, त्यांच्या हातात पडलेल्या चार दीडक्या आणि चेहऱ्यावरील दिनवाने भाव आठवले की आजही काळजावर चरा उमटतो.
मामा-भाचा तथा येऊर डोंगराच्या पश्चिमेला जगप्रसिद्ध कान्हेरीची बौद्ध लेणी आहेत, बौद्ध भिखू कान्हेरीहून चालत येऊरचा डोंगर उतरून खाली येत व येथून कल्याणमार्गे थळघाट, नाणेघाट, बोरघाटामार्गे देशावर जात, येऊरबरोबर त्याचे डोंगरभाऊही दक्षिणोत्तर धावताना दिसतात, त्यात कान्हेरी लेणी समूहाबरोबरच मंगलस्थान किंवा मागाठाण, जोगेश्वरी, कोंडीवटेची लेणी आहेत यापैकी मंडपेश्वर व जोगेश्वरी ही हिंदू लेणी आहेत. पूर्वी हा सर्व भाग साष्टी बेटावर म्हणजे ठाण्यात मोडत होता. १९९२ साली येऊरच्या जंगलात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या आदिवासी मुलाला १३ व्या शतकातील तुघलकाची १०० नाणी एका झाडाच्या बुंद्धयात सापडली ही अलीकडचीच घटना असल्यामुळे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या येऊर डोंगराबद्दल जिज्ञासा व प्रेम या दोन्ही भावना तीव्र होऊ लागतात.
येऊर गावाच्या दक्षिणेकडील उंच डोंगर माथ्यावर मामा-भाचा यांचा दर्गा आहे. हजरत सय्यद बहाउद्दीन व हजरत सय्यद बद्रुद्दीन हे मामा-भाचे सुफी पंथाचे होते. हे दोघे केव्हा आणि कसे आले त्याचा इतिहास उपलब्ध नाही, पण डोंगराच्या पायथ्याशी मोमीन मुईऊद्दीन यांचा इ. स. १७६० साली बांधलेला दर्गा असून, बाजूलाच हजरत हाजी अमानुल्ला शाहसाहेब यांचा दर्गा आहे. डोंगर माथ्यावरील मामा-भाचा दग्र्याचे दर्शन घ्यायला सर्व जाती धर्माचे लोक येतात. येथून ठाणे शहराचे विलोभनीय विहंगम अशा दर्शनाने देहभान हरपून जाते.
येऊरला पाटीलपाडा गावाच्या आधी डाव्या बाजूला एअरफोर्सचे कार्यालय व कर्मचारी वसाहत आहे. पाटील पाडय़ाला फडके यांच्या जागेत कलावती माता यांचे मंदिर असून, मंदिराच्या समोरील डोंगराच्या कुशीत १९८२ साली तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते सुरू झालेला विवेकानंद बालकाश्रम आहे. कलावती मंदिराच्या पुढे अवकाश दळणवळण भू केंद्र (सॅटेलाइट अर्थ सेंटर) आहे. येऊरचा कायापालट झपाटय़ाने होऊ लागला आहे. डांबरी पक्के रस्ते वीज, पाणी, दिवाबत्ती आणि बससेवा उपलब्ध झाली आहे. येऊरचा डोंगर आता ठाण्याचा मिनी माथेरान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे ते तिथे नव्याने आलेल्या धनदांडग्या लोकांनी बांधलेल्या बंगल्यामुळे.
एकेकाळी उपवन तलावापासून येऊरच्या अंतर भागापर्यंत घनदाट वृक्षवेलींनी दाटलेला येऊरच्या जंगलात बिबटे, वाघ,  हरणे, भेकरे, सालिंदर, कोल्हे, रानडुक्कर, तरस, ससे, निरनिराळ्या जातींची माकडे, घोरपड, मुंगूस, अजगर, किंग कोब्रा आदी सरपटणारे प्राणी, निरनिराळे पक्षी आणि सुमारे चारशे जातीची फुलपाखरे, लहान बटन फुलांपासून वीत-दीड वितांपर्यंत मोठी होणारी सूर्यफुले, अशी वनसंपत्ती होती. पण आता तिन्ही ऋतूत निसर्गाचा भरजरी साज ल्यायलेला येऊरचा डोंगर आणि निसर्गपुत्र आदिवासी यांची नाळ आता तुटत चालली आहे. तेव्हा वेळीच जर लक्ष नाही घातले तर ठाण्यात जशी काँक्रीटची जंगले उभी राहिली तशी येऊर डोंगरांचे नुसते माथे राहतील रान राहणार नाही.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण