पालिका डॉक्टर, परिचारिकेचे निलंबन

ठाणे :  कळवा येथील आतकोनेश्वरनगरमधील लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला करोना लशीऐवजी रेबीज लस दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी  पालिकेने तेथील डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित केले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत एका महिलेला एकाच वेळेस करोना लशीचे तीन डोस दिल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर करोना लशीची दुसरी मात्रा घेतलेली नसतानाही एका ज्येष्ठ नागरिकाला लशीची दुसरी मात्रा घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला होता. अशातच कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागातील लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला करोना लशीऐवजी रेबीज लस देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचे  पालिकेने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल होताच त्यांनी तातडीने मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापौर म्हस्के यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे करोना लशीऐवजी रेबीज लस देणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेवर निलंबनाची कारवाई केली.

पालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा

ठाणे शहरातील फेरीवाल्यांकडून ताबा पावती वसुली करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी किसननगर परिसरातून पकडून श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबतही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले व संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गणेशमूर्ती कचऱ्यात

उपवन येथील कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तलावाबाहेर काढून कचऱ्यामध्ये फेकण्यात आल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी या गणेशमूर्ती विधिपूर्वक खाडीत विसर्जित केल्या होत्या. हा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर म्हस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर प्रशासनाने प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.