मीरा रोडच्या कॉल सेंटरवरील कारवाईनंतर तरुण कर्मचाऱ्यांचे पालक भयभीत; फसवणुकीशी संबंध नसल्याचा दावा

बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडमधील नऊ कॉल सेंटरवर ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री छापे टाकून कारवाई केली. या कारवाईनंतर या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण मुलांचे पालक भयभीत झाले असून, या प्रकारात आमच्या मुलांचा काहीच दोष नसल्याचा आक्रोश त्यांच्याकडून केला जात आहे. सकाळी मुले घरी न आल्याने पालकांनी कॉल सेंटरच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आणि मुलांना सोडून देण्याची विनंती पोलिसांकडे केली. तरुण मुलांचा वापर करून घेतला असल्याचा आरोप करून त्यांनी संतापही व्यक्त केला.

मीरा रोडच्या नयानगर परिसरातल्या बाले हाऊस व ओसवाल हाऊस येथील दोन तर पेणकर पाडा येथील हरी ओम आयटी पार्क या कॉल सेंटरवर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले. पेणकरपाडा येथील या एकाच इमारतीत तब्बल सात कॉल सेंटर चालवली जात होती. परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. या कॉलसेंटरमध्ये जवळपास पाचशेच्या आसपास कर्मचारी काम करीत होते. पोलिसांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. अधिकारी वर्ग वगळता यातील बहुतांश कर्मचारी २० ते २२ या वयोगटांतील आहेत. कामाच्या पद्धतीनुसार त्यांना ११,००० ते २०,००० इतके वेतन दिले जायचे. बारावी पास आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही पात्रता आवश्यक असल्याने शिक्षण अर्धवट सोडलेले आणि शिक्षण करून कामधंदा करू इच्छिणाऱ्या तरुणांनी या ठिकाणी नोकरी पत्करली. मुलाखती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जायचे. अमेरिकी इंग्रजी कसे बोलायचे, परदेशी नागरिकांशी कसा संवाद साधायचा याचे धडे दिले जायचे, असे एका तरुणाच्या नातेवाईकाने सांगितले.

पोलिसांनी अखेर सकाळी साडेआठच्या सुमारास जे नवीन कामाला लागले होते, त्यांना सोडण्यास सुरुवात केली. ज्यांना दीड ते दोन महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला होता, अशांना पोलिसांनी नोटीस दिली असून पुढील चौकशीसाठी ठाणे येथे दिलेल्या मुदतीत हजर राहण्यास सांगितले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना मात्र या वेळी अटक करून ठाण्याला नेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   सकाळ झाली तरी मुले कामावरून न परतल्याने पालक चिंतित झाले होते. चौकशी सुरू असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइलही बंद करून ठेवण्यात आले असल्याने पालकांच्या चिंतेत भरच पडत होती. अखेर अनेक पालकांनी मुलांच्या शोधासाठी बुधवारी सकाळी थेट कॉल सेंटरचे कार्यालय गाठले. या ठिकाणी सुरू असलेली पोलिसांची कारवाई पाहून पालक भयभीत झाले. आपली मुले सुटणार की नाहीत या काळजीने त्यांची सतत घालमेल सुरू होती. मालाडहून आलेल्या सैफुल्ला अब्दुल शेख यांचा मुलगा मोहम्मद हा अवघ्या दीड महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. अर्धवेळ नोकरी करून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. पुढच्याच आठवडय़ापासून त्याची परीक्षा सुरू होणार असल्याने सैफुल्ला खान काळजीत पडले होते.  मुलाकडून अशा प्रकारचे काम करवून घेत असल्याचे खुद्द मुलालाही माहीत नव्हते, असा दावा सैफुल्ला खान यांनी केला.

पोलिसांच्या छाप्यानंतर कामाविषयी माहिती

पेणकर पाडा येथील कॉल सेंटर अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते. सायंकाळी सात ते पहाटे चार वाजेपर्यंत कामाची वेळ ठरलेली होती. अनेक पालकांना तर आपला मुलगा कॉल सेंटरमध्ये नेमके काय काम करतो हेही माहिती नव्हते. मात्र पोलिसांच्या छाप्यानंतर मुलांकडून अशा प्रकारची कामे करवून घेत असल्याबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.