महापालिकेच्या सभागृहाला प्रमोद महाजन यांचे नाव असतानाही ठेकेदाराकडून नाव बदलण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप

भाईंदर पूर्व परिसरातील   महानगरपालिकेच्या  प्रमोद महाजन सभागृहाला   ठेकेदाऱ्याकडून  चक्क  खाजगी नाव देण्यात आल्यामुळे समाजसेवक आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण  पसरले असल्याचे दिसून आले आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील  बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ   महानगरपालिकेकडून कोटय़वधी रुपये खर्च करून  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या   हस्ते  २०१८ रोजी  स्व.प्रमोद महाजन सभागृहाचे  उद्घाटन करण्यात आले होते. या उभारण्यात आलेल्या  सभागृहला स्व.प्रमोद महाजन सभागृह असे नाव दिले गेले असताना देखील त्याला चालवणाऱ्या  ठेकेदाराने  सभागृहावर स्वत: च्या कंपनीच्या नावाचा  गोल्डन पेटल बैंक्वेट असा  नामफलक लावला आहे. हा खाजगी नामफलक लावल्यामुळे नागरिकांची  दिशाभूल होत असून नक्की हे सभागृह खाजगी आहे की पालिकेचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून   स्व .प्रमोद महाजन यांचे नाव सभागृहाला दिले असताना देखील  ठेकेदाराने दुसरे नाव दिल्यामुळे स्व. प्रमोद महाजन यांच्या नावाचा देखील ठेकेदाराकडून अपमान केला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालिकेत भाजपची सत्ता आहे व या सभागृहाचा ठेकाही भाजपा नगरसेवकाच्या कंपनीनेच घेतला आहे. असे असतानाही प्रमोद  महाजन यांचा अपमान होत आहे.एवढेच नाही तर एकाच सभागृहाला दोन नावे दिल्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे.हे सभागृह नक्की पालिकेचे आहे की ठेकेदाराच्या मालकीचे  असा  प्रश्न  नागरिकांना पडला आहे.

संबंधित सभागृहाच्या ठेक्याची  योग्य तपासणी करूनच पुढील निर्णय  घेण्यात येईल. -दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग