शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते काही प्रभागांमध्ये एकमेकांना भिडल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील शिवसेना समर्थकांच्या घरावर ५० ते ६० जणांनी अचानक हल्ला केला. हवेत गोळीबार करत परिसरातील वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. हल्लेखोर पळून जात असताना त्यांनी पळून जात असताना त्यांनी शिवसेना शहरप्रमुखाच्या गाडीच्या काचा फोडल्या. चालक सुधीर दळवी यांना मारहाण केली. याप्रकरणी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांच्यासह ६० जणांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास म्हात्रे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. गरिबाचा वाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री काही गुंडांनी श्री साई सुखदेव चाळीतील शिवसेना समर्थकांच्या घरावर गोळीबार केला. गरिबाचा वाडा प्रभागात शिवसेनेचे उमेदवार प्रताप पाटील, भाजपचे विकास म्हात्रे निवडणूक लढवीत आहेत. पाटील यांचे समर्थक नीलेश म्हात्रे त्यांचा प्रचार करतात याचा राग मनात ठेवून त्यांच्या कुटुंबावर व इतर स्थानिक रहिवाशांवर या ५० ते ६० गुडांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे.
नीलेश म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात सुमारे ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेशी आपला काही संबंध नाही. आपल्याला नाहक बदनाम करण्यासाठी हे काहूर उठवण्यात आले आहेत, असे विकास म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पदाधिकाऱ्यावर गोळीबार
भाजपचे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी संजय देसले यांच्यावर दोन मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
बाचाबाची
शिवमार्केट प्रभागात प्रचार संपला तरी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुंबईतील एक आमदार फिरत होते. मनसेचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई व त्यांच्या समर्थकांनी या प्रचाराला हरकत घेतली. या वेळी मनसेचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले.