दोन ठिकाणी चोरी, तर तीन ठिकाणी प्रयत्न
लोकमान्यनगर भागातील इमारतींमधील दोन घरांमध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली असून यामध्ये चोरटय़ांनी सुमारे एक लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या दोन घरांव्यतिरिक्त अन्य तीन घरांमध्येही चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या घटना एकाच रात्रीत घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमान्यनगर येथील शंकर मंदिर परिसरात विठ्ठल सदन आणि बालाजी अपार्टमेंट आहेत. या इमारतीमधील काही रहिवासी कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी सोमवारी रात्री त्यांच्या घरांना लक्ष्य केले. विठ्ठल सदन या इमारतीमध्ये चोरटय़ांनी दोन घरे फोडली असून त्यापैकी एका घरातून आठ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे, तर दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल सदनच्या जवळच असलेल्या बालाजी अपार्टमेंटमधील तीन घरे चोरटय़ांनी फोडली. त्यापैकी एका घरातून चोरटय़ांनी एक लाखांचा ऐवज लुटून नेला आहे, तर उर्वरित दोन घरांत चोरीचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली. दरम्यान, लोकमान्यनगर भागात दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा वर्तकनगर पोलिसांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onचोरीRobbery
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber broke five houses in thane
First published on: 23-12-2015 at 00:01 IST