धान्यांची विक्री, महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचेही दर्शन
एकीकडे महागाईने ग्राहकांना ग्रासलेले असतानाच दुसरीकडे शेतकरी वर्ग पिकाला योग्य मोबदला मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. व्यवस्थेतील हा दोष दूर करून ग्राहकांना किफायतशीर दरात थेट शेतातील दर्जेदार माल मिळावा व शेतक ऱ्यांच्याही कष्टाचे चीज व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि भीमथडी जत्रा यांच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच ‘अन्नदाता धान्य खाद्य’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत शेतातील धान्याबरोबरच महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचेही दर्शन घडणार असून विविध प्रांतांतील खाद्यपदार्थाची मेजवानी खवय्यांसाठी असेल, तसेच बालगोपाळांसाठी खेळ मेळावाही होणार आहे.
डोंबिवली पूर्वेतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुलात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत ही जत्रा भरणार आहे. याविषयी माहिती देताना रोटरीचे अध्यक्ष राजीव मोहिते म्हणाले, तीन दिवसांच्या या जत्रेत वाडा, मोखाडा, तलासरी, बासमती येथील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणणार आहेत. यात धान्य, भाजीपाला, फळे आदी दर्जेदार शेती उत्पादनांची माफक दरात विक्री होणार आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने जप्त केलेला माल अद्याप बाजारात न आल्याने अजूनही ग्राहकांना डाळ चढय़ा भावानेच खरेदी करावी लागत आहे. या धान्य जत्रेत शेतातील डाळी ग्राहकांना माफक दरात उपलब्घ होतील. तसेच तांदुळ मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी असेल. त्यात बासमती, वाडा, कोलम, हातसडीचा भात इत्यादी प्रकारचे तांदुळ उपलब्ध असणार आहेत. शिवाय शेतातील भाज्या, हळद, मसाल्याचे पदार्थ हेही विक्रीसाठी असणार आहेत.
धान्ययात्रेत पारंपरिक लोककला व संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. वासुदेव, गोंधळी, पोतराज, भुत्या, वाघ्या मुरळी म्हणजे काय, ते कसे दिसतात याची प्रात्यक्षिके जत्रेत अनुभवता येतील. शिवाय तमाशा, पोवाडा, भारूड, कीर्तन याचीही झलक रसिकांना पाहायला मिळेल. खेडोपाडी असणारी बारा बलुते, जसे की सोनार, परीट, तांबट, लोहार, कुंभार, चांभार, कोळी, कोष्टी, विणकर, चौगुल, ढोर यांची अवजारे पाहायला मिळतील. खाद्य जत्रेमध्ये हुरडा पार्टी, पुरणाचे मांडे, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी, वऱ्हाडी, खान्देशी, कोकणी पद्धतीचे मांसाहारी व शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.
या जत्रेत गृहिणींसाठी गृहपयोगी पदार्थ, गच्चीवरील बाग,परसबाग याविषयी माहिती दिली जाईल. तसेच या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ोतकी व्यवसायाबाबत उत्सुकता असणाऱ्या होतकरू तरुणांसाठी शेती, खते आदी विषयांवर व्याख्याने आणि अत्याधुनिक शेतकी तंत्रज्ञान संपादन करण्याची सोय असेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी शेती एक व्यावसायिक संधी म्हणून पर्याय निवडण्यासाठीची मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली आहेत.
– केदार पटवर्धन, प्रकल्प प्रमुख