प्रशासनाकडून कठोर कारवाईस सुरुवात, दुकानांना टाळे, आस्थापनांना दंड

किशोर कोकणे

ठाणे : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेबाबत भिवंडी शहरात निरुत्साह असल्याची बाब समोर आली आहे. भिवंडीत लसीकरणाविषयीचे गैरसमज आणि अफवांमुळे नागरिक पुढे येत नसून शहरात आतापर्यंत केवळ २७.७ टक्के जणांनीच दोन्ही लस मात्रा घेतल्या आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी भिवंडी महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

भिवंडीत गुरुवारी नोटीस बजावूनही कामगारांचे लसीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना पालिकेने टाळे ठोकले असून त्याचबरोबर तीस हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच लसीकरणासाठी धार्मिक स्थळे आणि शाळांच्या माध्यमातून पालिकेने जनजागृतीही सुरू केली आहे.

लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांमुळे भिवंडीत अद्याप नागरिक लस घेण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  भिवंडी महापालिकेने शहरातील मौलवी, मशिदींचे विश्वस्त, उर्दु शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. मशिदींवरील भोंग्याद्वारे नागरिकांना लशीचे महत्त्व आरोग्य विभागाकडून पटवून देण्यात येत आहे. तसेच परिसरातील यंत्रमाग कारखान्यांतही पालिकेची पथके जाऊन कामगारांना लस घेण्यास विनंती करीत आहेत.

लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर पालिकेने गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत महापालिकेने तीन आस्थापनांना टाळे ठोकले. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या पथकांनी या आस्थापनांना भेट देऊन तेथील कामागारांची तपासणी केली होती. त्यावेळी येथील कामगारांनी लस घेतली नसल्याचे समोर आले.

पालिकेच्या पथकाने दुकान मालकाला नोटीस बजावून कामगारांना लस देण्याची सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही मालकांनी कामगारांना लस दिली नव्हती. काही आस्थापनाच्या व्यापाऱ्यांनी कामगारांचे लसीकरण करून घेऊ असे आश्वासन पथकाला दिले. संबंधित व्यापाऱ्यांना पथकाने प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. नंतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली. मुखपट्टी विना वावरणाऱ्या कामगारांकडून पथकाने पाचशे रुपये दंड वसूल केला.

शहरातील लसीकरणाची स्थिती

  • भिवंडी महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे. त्यापैकी केवळ ३ लाख ६३ हजार ४८२ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर १ लाख ६२ हजार ८७२ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे.
  • सद्यस्थितीत लशींचा मुबलक साठाही पालिकेकडे उपलब्ध आहे. तरीही नागरिक लसीकरण केंद्रांवर फिरकत नसल्याचे चित्र आहे. शहरातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या एकूण नागरिकांपैकी ६१.०७ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर, २७.७ टक्के नागरिकांनी लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत.
  • महापालिकेने लसीकरणासाठी भरारी पथके, घरोघरी लसीकरण तसेच १० हून अधिक ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. दिवसाला १५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिकेकडून आखले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दिवसाला पाच हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. अशी माहिती भिवंडी पालिका सूत्रांनी दिली.
  • भिवंडी महापालिका क्षेत्रात सध्या करोनाचे १५ सक्रीय रुग्ण आहेत. तर  शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८ टक्के इतके आहे. करोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी आतापर्यंत ४७८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

भिवंडीत लसीकरम्णाबद्दलचे गैरसमज आणि अफवांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, मशीदींचे विश्वस्त, मौलवी, शाळांतील शिक्षक यांच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना लशींचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे लसीकरण करीत आहोत.

–  सुधाकर देशमुख, आयुक्त, भिवंडी महापालिका