बदलापूर नगराध्यक्षपदी सेनेकडून विजया राऊत यांचे नाव निश्चित
कुळगाव-बदलापूर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दिवंगत नेते मोहन राऊत यांच्या पत्नी विजया राऊत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांचा विचार व्हावा, अशी मागणी प्रवीण राऊत यांनी केली होती. सेनेच्या दोन गटातील संघर्षांचा फायदा इतर पक्षांना होण्याच्या भीतीने पक्षातील दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेत विजया राऊत यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ लवकरच संपणार असून पुढील अडीच वर्षांसाठी नव्या नगराध्यक्षासाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राऊत गटाकडून उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी दिवंगत बंधू मोहन राऊत यांच्या पत्नीला हे पद द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पसंतीतील प्रियेश जाधव यांचे नाव वर्षभरापासून चर्चेत होते. राऊत कुटुंबाच्या दाव्यामुळे २० नगरसेवक असलेला भाजप आणि दोन नगरसेवक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सेनेच्या अंतर्गत संघर्षांचा फायदा घेण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचा सल्ला दिल्याचे कळते. त्यानुसार राऊत कुटुंबातील विजया राऊत यांना नगराध्यक्षपद देण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. शिवसेनेत कोणतीही दुफळी नसल्याने सेनेच्या सर्व नगरसेवकांशी चर्चा करून सव्वा वर्षांसाठी विजया राऊत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर उर्वरित काळासाठी प्रियेश जाधव यांची वर्णी लागणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. दिवंगत मोहन राऊत हे निष्ठावान शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांच्या पत्नीला हे पद दिल्याची भावनाही म्हात्रे यांनी व्यक्त केली.
भाजप अजूनही सत्तेतच
वर्षभरापासून भाजप शिवसेनेसोबत पालिकेत सत्तेत असल्याने नव्याने युतीबाबतच चर्चा करण्याचा प्रश्नच नसल्याचे वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप सत्तेत समाधानी नसल्याचे भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजप निवडणुकीत शिवसेनाविरोधी भूमिका घेते का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र भाजपनेच युतीबाबत स्पष्टीकरण द्यावे, असेही म्हात्रे यांनी सांगितले आहे.
अंबरनाथमध्येही बदलापूरचा कित्ता?
अंबरनाथ : बदलापूर नगराध्यक्ष पदाची निश्चिती झाली असली तरी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कोण बसणार याची उत्सुकता अद्यापही कायम आहे. शिवसेनेत दोन गट या पदासाठी आग्रही असून वाळेकर यांचे पारडे जड मानले जाते. मात्र सव्वा वर्षांच्या बदलापूर सूत्रावर अंबरनाथमध्येही एकमत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंबरनाथमध्येही वाळेकर आणि वारिंगे अशा दोन्ही गटांना नगराध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या १८ नोव्हेंबर रोजी संपणार असून त्यापुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी सेनेने जुन्या मित्रपक्षांना घेऊन पुन्हा एकदा नगराध्यक्ष स्वत:कडे ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपने नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचे केलेले सूतोवाच आणि पक्षातील इच्छुकांची दावेदारी यामुळे शिवसेनेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणे कठीण जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सेनेतून अरविंद वाळेकर यांच्या कुटुंबातील मनिषा वाळेकर तर पंढरीनाथ वारिंगे यांच्या कुटुंबातील पूनम वारिंगे यांची नावे चर्चेत आहेत. वारिंगे कुटुंबातील सदस्यांनी अडीच वर्षे सत्तेत राहूनही एकही पद न भूषविल्याने त्यांना नगराध्यक्ष पद मिळावे अशी मागणी होत आहे तर वाळेकर कुटुंबात शहरप्रमुख, उप नगराध्यक्षपद, तीन नगरसेवक अशी पदे असल्याने नगराध्यक्ष हे सर्वोच्च पदही त्यांना मिळावे अशी त्यांची मागणी आहे. नगराध्यक्ष सेनेचा आणि तोही बिनविरोध असेल असे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितले आहे.