scorecardresearch

भिवंडीत भाजप शिवसेनेला रोखणार?

शिवसेनेपुढे भाजपचे आव्हान

भिवंडीत भाजप शिवसेनेला रोखणार?
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाजपला राज्यात अन्यत्र यश संपादन करता आले असले तरी ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेनेच्या ताकदीपुढे भाजपचा तेवढा निभाव लागलेला नाही. कुख्यात पप्पू कलानीच्या मुलाला बरोबर घेऊन उल्हासनगरमध्ये सत्ता संपादन केलेल्या भाजपला आता भिंवडी-निजामपूर महानगरपालिकेच्या सत्तेचे वेधे लागले असून, शिवसेनेचा पाडाव करण्याकरिता भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे.

लोकसभा निवडणुकांपासून अन्य पक्षांतून भाजपमध्ये येण्याचे प्रमाण वाढले. भिवंडी लोकसभेच्या खासदारकीसाठी राष्ट्रवादीचे कपिल पाटील हे भाजपवासी झाले. लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. अन्य पक्षांमधून येणाऱ्यांना फार काही महत्त्व भाजपमध्ये दिले जात नाही. अपवाद खासदार कपिल पाटील यांचा. ठाणे जिल्ह्य़ातील भाजप संघटनेचे प्रमुखपद पाटील यांना बहाल करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला आणि बघता बघता ठाणे किंवा पालघर जिल्ह्य़ातील अन्य कोणत्याही नेत्यांपेक्षा पाटील यांचे भाजपमध्ये महत्त्व वाढले. मुख्यमंत्रीही त्यांच्या कलाने निर्णय घेऊ लागले. अशा या कपिल पाटील यांना भिव्ांडी या आपल्या प्रभाव क्षेत्रात छाप पाडायची आहे. यामुळेच भिवंडीची सत्ता मिळविण्याकरिता कपिल पाटील यांनी सारी ताकद पणाला लावली आहे.

निवडणुकांच्या तोंडावर शहरातील पाणी आणि मलनिस्सारण योजनेसाठी तब्बल २०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे प्रकल्प मंजुर करत भाजपाने ही निवडणुक स्वबळावर लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मुस्लिम बहुल मतांचे राजकारण करत कॉग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडीत आपआपल्या पक्षांचे बालेकिल्ले उभे केले असले तरी विधानसभा निवडणुकीत महापालिका हद्दीतील दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपने विजयाची पताका फडकावत राजकीय पंडीतांचे अंदाज चुकविले. भिवंडी पश्चिमेत महेश चोघुले यांच्या विजयामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे या भागातील आमदार रुपेश म्हात्रे आणि भाजप नेत्यांमधील विसंवादामुळे येथे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र्यपणे निवडणुक लढविण्याची तयारीत असल्याचे चित्र आहे.

बेकायदा गोदामांमधून कंपन्यांचे जाळे

  • मुस्लिम बहुल वस्तीचे आणि यंत्रमागाचे शहर अशी ओळख असणाऱ्या भिवंडीचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण होत असून येथील खाडी किनारी उभ्या राहीलेल्या बेकायदा गोदामांमधून बडय़ा कंपन्यांचे जाळे या भागात विणले जात असल्याने येथील अर्थकारणही झपाटय़ाने बदलू लागले आहे.
  • भिवंडी शहरावर गेली अनेक वर्ष कॉग्रेस, समाजवादी यासारख्या पक्षांचा दबदबा राहीला. शिवसेनेने हिंदू तसेच आगरी बहुल मतांचे आक्रमक राजकारण करत या शहरात पाय रोवण्यास सुरुवात केली. कॉग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या तीन पक्षांनी या भागात प्रामुख्याने मुस्लिम मतदार केंद्रीत राजकारण केले. त्यामुळे या पक्षाची मते विभागली जाऊ लागली आणि त्याचा फायदा शिवसेनेला मिळू लागला.
  • काही वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भिवंडीतून शिवसेनेचे योगेश पाटील अगदी अल्प मतांनी विजयी झाले आणि तेव्हाच या बदलाचे संकेत मिळू लागले. नव्या मतदार रचनेत भिवंडी महापालिका क्षेत्रात विधानसभेचे दोन मतदारसंघ तयार झाले. येथील पुर्व भागातून शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांनी विजय मिळवला आणि पुढे महापालिका निवडणुकीत या पक्षाचे तब्बल १७ नगरसेवक निवडून आले.
  • विरोधी पक्षातील अंतर्गत मतभेदांचा फायदा उचलत शिवसेनेने अवघ्या १७ नगरसेवकांच्या जोरावर भिवंडीचे महापौर पद पटकाविले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र येथील राजकीय समिकरणे वेगाने बदलू लागले असून कपील पाटील यांच्या रुपाने खासदार तर महेश चौघुले यांनी पश्चिमेसारख्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळविल्याने महापालिका निवडणुकीतही या विजयाची पुनरावृत्ती करण्याची व्युहरचना भाजपने आखली आहे.
  • परभणी या मुस्लीमबहुल शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मुस्लीम मतदारांचा कौल काँग्रेसकडे झुकला असल्यास भिवंडीमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करू शकते.

शिवसेनेपुढे भाजपचे आव्हान ?

ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या करूनही दोन्ही ठिकाणी शिवसेनेने विजय मिळविला होता. अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन मोठय़ा नगरपालिकांमध्ये भाजपवर मात करीत शिवसेनेने सत्ता संपादन केली होती. मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या दोन महानगरपालिकांमध्ये भाजपची आता सत्ता आहे. दोन महिन्यांमध्ये मीरा-भाईंदरची निवडणूक होणार आहे. भिवंडीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सहजासहजी माघार घेणार नाहीत हेही तेवढेच.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2017 at 01:51 IST

संबंधित बातम्या