ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात जल तसेच मलवाहिन्यांच्या गळतीमुळे तीन ते चार ठिकाणी मुख्य रस्ते खचल्याचे प्रकार समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता नितीन कंपनी चौकातील रस्त्याला जलवाहिनीच्या गळतीमुळेच भगदाड पडल्याची बाब पालिकेच्या पाहाणीतून समोर आली आहे. यामुळे रस्त्याखाली टाकण्यात आलेल्या जल तसेच मलवाहिन्यांच्या गळतीमुळे शहरातील रस्ते धोकायदायक बनू लागल्याचे चित्र असून यामुळे शहरात मोठा अपघात घडण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होऊन कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरातील अनेक प्रमुख रस्ते रुंद केले आहेत. याशिवाय, पालिकेने शहरात जल तसेच मलवाहिन्यांचे जाळे विणले असून या वाहिन्या रस्त्याखालून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या वाहिन्यांच्या गळतीमुळे रस्ता खचण्याचे प्रकार आता घडू लागल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्यावर्षी लोकमान्यनगर भागातील मुख्य रस्ता दोनदा खचला होता. या रस्त्याखाली असलेली मलवाहिनीतून पाण्याची गळती होत होती. हे पाणी झिरपून त्या भागातील माती भुसभुशीत होऊन हा रस्ता खचला होता. तसेच कोपरी येथील बारा बंगला परिसरातील मलनि:सारण वाहिनीचे काम सुरू असताना रस्त्याखाली माती सरकत असल्यामुळे तो रस्ता खचला होता. सावरकरनगर येथेही रस्ता खचला होता. वागळे इस्टेट भागातही एका ठिकाणी रस्ता खचला होता. जल तसेच मलवाहिन्यांच्या गळतीमुळेच हे रस्ते खचल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ ठाण्यातील वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जाणारा नितीन कंपनी चौकाजवळील रस्त्याला बुधवारी सायंकाळी चार फुट लांबीचे भगदाड पडून त्यात टेम्पो अडकला होता. टेम्पोचालक राहुल राठोड हे ठाण्याहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी ही घटना घडली. यात कुणालाही दुखापत झालेली नव्हती. टेम्पो क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला होता. या ठिकाणी धोकापट्टी लावून मार्गरोधक उभारण्यात आले होते. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळाची पाहाणी केली. त्यावेळेस या रस्त्याखाली असलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. या जलवाहीनीची गळती बंद करून त्या खड्ड्यात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यावर आता खडी टाकून रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

अपघातांची शक्यता

गेल्या वर्षभरात कोपरी, लोकमान्यनगर, सावरकरनगर आणि नितीन कंपनीजवळ रस्ता खचल्याच्या घटना घडल्या असल्या तरी त्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु नितिन कंपनी जवळील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये टेम्पो अडकला होता. त्यामुळे अशा घटनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याशी सातत्याने संपर्क करूनही त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.