टेकडय़ांवरील घरांवर ‘माळीण’ची भीती

डोंगरकडा कोसळल्यास ढिगाऱ्याखाली लाखो संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता

इंदिरानगर येथील टेकडीवर दाटीवाटीने घरे वसली आहेत.

डोंगरकडा कोसळल्यास ढिगाऱ्याखाली लाखो संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता

किन्नरी जाधव, शलाका सरफरे, ठाणे :

तीन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव डोंगरकडा कोसळल्याने ढिगाऱ्यांखाली गाडले गेले. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाणे शहरातील टेकडींवर वसलेल्या घरांमुळे होऊ शकते. टेकडींवर दाटीवाटीने वसलेल्या या वस्त्या मुसळधार पावसामुळे खाली कोसळण्याची भीती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या टेकडय़ांवरील कुटुंबांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात येत असल्या तरी त्याची त्यांना पर्वा नाही. टेकडय़ांच्या मागेच असलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगराचा काही भाग अतिवृष्टीत खचल्यास या ढिगाऱ्याखाली टेकडय़ांवरचे लाखो संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागमोडी वळणे घेत चढणीवर एकावर एक वसलेली अनधिकृत घरे, गल्लीबोळाच्या पायऱ्या चढत नाल्यांवर लहानशा चौकोनात थाटलेले संसार, एका वेळी एकच व्यक्ती पार होऊ शकेल इतक्या निमुळत्या गल्लीतून घराकडे जाणारी चढती वाट, घराच्या खिडकीतून थेट नाल्यात टाकला जाणारा कचरा, नैसर्गिक विधीसाठी एकमेकांवर वसलेल्या घरांचा पार करावा लागणारा डोंगर असे चित्र मुख्य शहरापासून लांब अंतरावर असणाऱ्या टेकडय़ांवर पाहायला मिळते. इंदिरानगर, रामनगर, हनुमाननगर परिसरातील या टेकडय़ांवर गेल्या काही वर्षांपासून लोकवस्ती झपाटय़ाने वाढत असली तरी मुसळधार पावसात येथे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या टेकडय़ांवरील कुटुंबांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात येत असल्या तरी महापालिकेकडून येणाऱ्या धोक्याच्या सूचना रहिवाशांसाठी नित्याच्याच झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात सुरक्षेसाठी घरे सोडण्याचे सूचना फलक परिसरात लावण्यात येत असले तरी टेकडीवरचे रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर इंदिरानगर, रामनगर, रुपादेवीपाडा, हनुमाननगर या ठिकाणी टेकडीवर वसलेल्या रहिवाशांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी याकडे कानाडोळा केला. ‘प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेच्या घर सोडण्याच्या सूचना येत असल्या तरी नेमके जायचे कुठे, असा प्रश्न येथील रहिवाशांपुढे असतो,’ असे येथे ४० वर्षांपासून राहणारे रवी गायकवाड सांगतात.

मुख्य शहरापासून वागळे इस्टेट परिसरात चढणीच्या रस्त्यावर गेल्यावर अनधिकृत घरांचे इमले एकमेकांवर उभे राहिलेले पाहायला मिळतात. एका संपूर्ण टेकडीवर हरितपट्टा दिसेनासा होत केवळ लहान-लहान घरे दाटीवाटीने उभी राहिली आहेत. या घरांच्या गल्लीबोळातून दिसणाऱ्या नाल्यांच्या भिंतीवर चढत टेकडीच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचता येते.

अतिवृष्टीच्या काळात नाले भरून वाहत असल्यामुळे तसेच टेकडीमागेच असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग कोसळण्याची भीती आहे. औद्योगिक विकास महामंडळ आणि वनजमिनींच्या डोंगर उतारावरील झोपडय़ांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने येथील लोकसंख्येला मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडावे लागत आहे.

कचरा समस्या नेहमीचीच!

वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात दुसरी कचराभूमी तयार होत आहे. शहरातील घंटागाडय़ांमधून भरून आणलेला कचरा या ठिकाणी एकत्र करून दिवा कचराभूमीवर नेला जातो. त्यामुळे या भागात दिवसभर कचऱ्याची  दुर्गंधी पसरत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले, तसेच या दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत.

समस्या काय?

* सार्वजनिक शौचालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असून वाढत्या लोकसंख्येसाठी ती अपुरी पडत आहे.

* बहुतांश शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट असून सांडपाणी थेट रस्त्यावर पसरत असल्याने रोगराई पसरत असल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येते.

* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्यावर वसलेल्या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या या रस्त्यावर फेरीवाल्यांच्या दाटीवाटीतून वाहने चालवणेही कठीण असते.

* आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांवर वसलेल्या या घरांमध्ये काही दुर्घटना उद्भवल्यास सुटकेसाठी उपाययोजना राबवणे कठीण होत असते.

मुसळधार पावसात डोंगरावरून दरड कोसळण्याची भीती असते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात डोंगर उतारावरील झोपडीधारकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जाते. मुलत: हे सर्व अतिक्रमण वन विभागाच्या जागेवर असल्यामुळे पालिकेकडून केवळ सतर्कता म्हणून नोटिसा बजावण्यात येतात. त्यापैकी अनेक जण या ठिकाणाहून जाण्यास नकार देतात. ज्यांना स्थलांतरित होण्याची इच्छा असते त्यांना पालिकेकडून निवाऱ्याची सोय करून देण्यात येते.

– अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Slum dwellers in indira nagar living in fear of landslide

ताज्या बातम्या