पाणी देयकांची ‘स्मार्ट’ आकारणी स्थगित

पाण्याच्या वापरानुसार बिल आकारणीचा ‘स्मार्ट’ निर्णय ठाणे महापालिकेला पेचात टाकणारा ठरला आहे.

मीटर बसवण्याची योजना पूर्ण होईपर्यंत जुन्या दराने आकारणीचे आदेश

ठाणे : पाण्याच्या वापरानुसार बिल आकारणीचा ‘स्मार्ट’ निर्णय ठाणे महापालिकेला पेचात टाकणारा ठरला आहे. ‘स्मार्ट मीटर’चा फटका महापालिकेच्या तिजोरीलाच बसू लागल्याची बाब सर्वसाधारण सभेत पुढे आली आहे. त्यातून अनेक तक्रारींचे सूर उमटल्याने तूर्तास या निर्णयाला मुरड घालून योजना पूर्ण होईतोवर जुन्या दराने आकारणीचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

‘स्मार्ट मीटर’ पद्धतीमुळे काही भागांतून जादा बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत तर काही वसाहतींमध्ये बिलांमधील घोळ तसेच बिलांचा भरणा करताना थकबाकीदारांचा इतर ग्राहकांवर पडणारा भार यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे गणितही बिघडू लागल्याची बाब सर्वसाधारण सभेत उघड झाली.

जोपर्यंत या योजनेचे काम १०० टक्के पूर्ण होत नाही. तोपर्यंत पाणीपुरवठय़ाची देयके मीटरप्रमाणे वसूल करणे टाळावे. तसेच जुन्या दराने पाणीपुरवठा देयकांची वसुली करता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

पाणीपुरवठय़ाची देयके वसूल करण्यासाठी ठाणे महापालिकेने झोपडपट्टी तसेच इतर शहरी वसाहतींमध्ये स्मार्ट मीटर बसविले आहेत. असे असले तरी अनेक भागांत नागरिकांना अद्यापही देयके मिळाली नाहीत, अशा तक्रारी आहेत. तर काहीजणांना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी देयके देण्यात आली आहेत. त्याचा परिणाम ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे.

वागळे इस्टेट भागात महापालिकेला वर्षांला ९ कोटी ८५ लाख रुपयांचे पाणीपुरवठा देयक वसूल केले जात होते. परंतु आता महापालिकेला येथून ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती नगरसेवक योगेश जाणकर यांनी दिली. या भागात १३० मीटर चोरीला गेले असून पुन्हा नव्याने बसविण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी आठ हजार रुपये मागितले जात असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली. झोपडपट्टी भागातील स्मार्ट मीटर काढून टाकण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

अपव्यय टाळायचा असेल तर मीटर योग्यच

 झोपडपट्टी भागातील नागरिकांना पाण्याची देयके अधिक येत असताना दुसरीकडे गृहसुंकलातील नागरिकांना कमी देयके येत असल्याचा मुद्दा यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर झोपडपट्टी भागातील नागरिकांचा पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होत होता. आता देखील वापर अधिक असल्याचा दावा नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी केला. ज्या पद्धतीने पाणी वापरले जात असले त्या पद्धतीने देयके येणारच आणि पाण्याचा वापर कमी व्हावा, बचत व्हावी याच हेतूने मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर मीटर योग्यच असल्याचे मत माजी महापौर मीनाक्षी शिदे यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुढील वर्षभरापर्यंत स्मार्ट मीटर संपूर्णपणे बसविले जात नाहीत तोवर जुन्या दराने पाणीपुरवठा देयकांची वसुली करता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smart levy water bills postponed ysh

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या