स्वयंपूर्णतेतून स्वयंसिद्धीकडे : डिजिटल शिक्षण, तंटामुक्ती, स्वच्छ पाण्याचा पुरवठा यांसह अनेक सुविधा

स्वयंशिस्त, स्वच्छता आणि परस्परांमधील सुसंवाद या त्रिसूत्रींचे काटेकोर पालन करत मुरबाड तालुक्यातील कान्होळ या गावाने ठाणे जिल्ह्य़ापुढे आदर्श ग्रामजीवनाचा नवा वस्तुपाठ ठेवला आहे. तंटामुक्ती, दारूबंदी, गावातल्या प्राथमिक शाळेत आधुनिक पद्धतीचे डिजिटल शिक्षण, पाणीपुरवठा या साऱ्या आघाडय़ांवर ‘स्मार्ट’ सुविधा पुरवून कान्होळ ग्रामस्थांनी ‘स्वयंपूर्ण खेडे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले, तर प्रत्येक गाव राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारासारखे समृद्ध होऊ शकते, हे कान्होळने स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कान्होळ या सुमारे १२०० लोकवस्तीच्या गावाने अगदी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून स्थानिक पातळीवर राजकारण कटाक्षाने टाळले आहे. त्यामुळे १९६२ पासून आतापर्यंत गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होऊन सरपंच आणि सदस्य निवडले गेले. अजूनही ही परंपरा कटाक्षाने पाळली जाते. पूनम शेळके सध्या गावाच्या सरपंच असून सात सदस्यांपैकी पाच महिला आहेत.

गेली १६ वर्षे गावातील पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन महिलांच्या हाती आहे. मनीषा देसले त्याचे व्यवस्थापन पाहतात. सकाळी ५ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ अशा दोन सत्रांत पाणी सोडले जाते. घरटी ४० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. त्यातून विजेचे बिल आणि योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात गावाला पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. त्यातील ३ लाख २० हजार रुपये

खर्चून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्या टाकीतून सर्व गावाला पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक घराच्या मागे तसेच सार्वजनिक नळाच्या ठिकाणी शोषखड्डे आहेत. त्यामुळे पाणी इतरत्र न पसरता थेट जमिनीत मुरते. त्यामुळे कुठेही पाणी तुंबून राहत नसल्याने गावात डास, मच्छर आणि त्यांच्यामुळे होणारे आजार नाहीत. शिवाय शोषखड्डय़ांमुळे गावात आपोआप अतिशय उत्तम जलसंधारण होऊन कूपनलिकेद्वारे बारमाही मुबलक पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावानेही खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी पाणी बंद योजना कटाक्षाने राबवली. गावाशेजारील एका शेतघरमालकाने ग्रामस्थांसाठी यंत्रणा बसवून त्याद्वारे पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे.

स्वच्छता आणि शिक्षणाचे संस्कार

गावातील रहिवासी दररोज सकाळी आपापला परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे गावात कुठेही कचरा आढळून येत नाही. स्वच्छतेचे हे संस्कार नव्या पिढीतही रुजले आहेत. गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा असून लोकसहभागातून त्यात डिजिटल सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. गावात शिक्षणाचे प्रमाण लक्षणीय आहे. गावात एकूण २० शिक्षक असून ते निरनिराळ्या शाळांमध्ये शिकवितात. गावातील जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेला बसावे म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते.

पुरस्काराची घोषणा होण्याच्या किती तरी आधीपासून गाव तंटामुक्त आहे. गावातील कोणतेही वाद पोलीस ठाण्यापर्यंत जात नाहीत. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुतीच्या देवळात बैठक घेऊन सर्व निर्णय सहमतीने घेतले जातात. त्या निर्णयाचे पालन सर्व जण करतात. 

– जीवन शेळके, शिक्षक