ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी विशेष नियोजन

ठाणे : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पाच तालुक्यांमध्ये २४० विंधण विहिरी खोदण्यात येणार असून त्यापैकी १०६ विहिरींच्या खोदकामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यांतील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मार्च ते मे या महिन्यांदरम्यान भीषण पाणीटंचाईचा सामाना करावा लागतो. या कालावधीत तालुक्यांमधील ग्रामीण भागांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. २०१९-२० मध्ये प्रशासनाने जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये २४० विंधण विहिरी खोदण्यासाठी परवानगी दिली होती. यंदा करोनामुळे जिल्ह्यात सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या गावांमधील टंचाई निवारणाची कामे होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी टंचाई कामांसाठी ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक असलेली अट शिथिल करण्याचे आदेश दिल्याने तात्काळ टंचाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. विहिरींची कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी तालुक्यात ८१ आणि मुरबाड भागात २५ विहिरी खोदण्यात येणार असून या दोन्ही तालुक्यांतील १०६ विहिरींच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.  ही कामे अतिशय वेगाने पूर्ण करण्यात येणार असून येत्या काही वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भाग पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.