दिवाळीच्या तोंडावर वाहतूक नियोजनाची अद्याप प्रतीक्षा

दिवाळीच्या तोंडावर ठाणे स्थानक परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे संकेत वाहतूक पोलिसांनी दिले आहेत. मात्र यापैकी कोणताच उपाय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारपासून ठाण्यातील जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड या रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनाची अधिसूचना रविवापर्यंत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस स्थानक परिसरातील रस्त्यांवर कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही दिवस आधीच कपडे, फराळ तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहनांचा भार वाढून शहरातील मुख्य मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडी होऊ  लागली आहे. असे असले तरी ठाणे वाहतूक पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियोजन तसेच वाहतूक बदल करण्यात आलेले नाही. जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड, घंटाळी रोड या महत्त्वाच्या रस्त्यांलगत असलेल्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होते. मात्र या भागांतील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अद्याप वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. शनिवारी आणि रविवारी या गर्दीत भर पडून येथे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही.

ठाण्यातील विवियाना, कोरम, आर मॉल, हायपर सिटी यांसारख्या विविध मॉलमध्येही खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र मॉलच्या बाहेरही कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियोजन नाही. मॉलच्या बाहेर विविध रिक्षा प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उभ्या राहात आहेत. रिक्षांच्या गर्दीमुळे मॉल परिसरातही मोठी कोंडी होत असून येथील मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अद्याप वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार करणे सुरू आहे. वेगवेगळ्या ठाण्यातील वाहतूक पोलीस शाखांकडून नियोजन मागवले आहे. रविवारी दिवाळी वाहतूक  नियोजन जाहीर करण्यात येईल.

– निळकंठ पाटील, व्यवस्थापक-  ठाणे पोलीस वाहतूक विभाग

टीएमटीची ‘खरेदी सफर’

४० रुपयांच्या तिकिटात दिवसभर बसप्रवास

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ठाणे परिवहन सेवकडून नागरिकांसाठी खास बससेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतला. ‘हॉप अ‍ॅण्ड शॉप’ असे या बससेवेचे नाव असून कासारवडवली, वाघबिळ, भूमी एकर, गावंडबाग, टिकुजीनीवाडी या भागांतून या बस निघणार असून शहरातील विविध अंतर्गत आणि मध्यवर्ती भागांतून प्रवाशांची वाहतूक होणार आहे. या बससेवेसाठी प्रवाशांना संपूर्ण दिवसासाठी केवळ ४० रुपये दराचे तिकीट निश्चित करण्यात आले आहे. ही विशेष बससेवा २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे.

ठाण्यातील गोखले मार्ग, नौपाडा, राम मारुती रोड, जांभळी नाका या प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी शहराच्या अंतर्गत भागांतून मोठय़ा संख्येने नागरिक येत असतात. या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता ठाणे महापालिकेने दिवाळीच्या कालावधीत २८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विशेष बससेवा नागरिकांसाठी सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.

* बससेवेचे वेळापत्रक

कासारवडवली नाका ते कासारवडवली नाका (रिंग रुट) बसमार्ग : कासारवडवली नाका, मानपाडा, माजिवडा नाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, मनपा भवन, अल्मेडा चौक, सोपान सोसायटी, राम मारुती रोड मार्गे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स, ए. के. जोशी विद्यालय, मल्हार सिनेमा, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, मानपाडा, कासारवडवली नाका.

वेळापत्रक : १०.०० ११.०० १.३० ०३.१० ०६.०० ७.३०

वाघबीळ ते वाघबीळ (रिंगरुट) बसमार्ग : वाघबीळ गाव, वाघबीळ नाका, मानपाडा, माजिवडा नाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, मनपा भवन, अल्मेडा चौक, सोपान सोसायटी, राम मारुती रोड मार्गे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स, ए. के. जोशी विद्यालय, मल्हार सिनेमा, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅॅडबरी जंक्शन, मानपाडा, वाघबिळ नाका, वाघबिळ गाव.

वेळापत्रक : १०.३०  १२.००  ०२.००  ०३.३०  ०६.००  ०७.५०