|| किशोर कोकणे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यात अफवा पसरवल्याच्या दोन घटना उघड

ठाणे :  करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची काटेकोर अमलबजावणी करण्यात पोलीस दल व्यग्र असताना घरबसल्या करोनाविषयी अफवा पसरवून समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. ठाण्यात अशाचप्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या असून विशेष म्हणजे, अफवा पसरविणारे संदेश पाठविणारे दोघेही सुरक्षित असल्याची बाब पुढे आली आहे.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात राहणारा एक तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून त्यामध्ये बुधवारी रात्री त्याने एक संदेश पाठविला. त्यात त्याने स्वत:ला करोनाची बाधा झाल्याचे म्हटले होते. या प्रकारानंतर त्या ग्रुपवरील इतर सदस्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र, माझी प्रकृती गंभीर झाल्यावरच तपासणीसाठी जाईन. त्यापूर्वी संपूर्ण जगाला करोना बाधित करीन, अशी धमकी त्याने सदस्यांना दिली. त्याची गंभीर दखल घेऊन एका सदस्याने ही बाब तात्काळ कासारवडवली पोलिसांना दिली. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी महापालिकेच्या डॉक्टरांना त्या तरुणाची तपासणी करण्यासाठी घरी नेले. त्यावेळेस त्याला करोनाची लागण झालेली नसून त्याने खोडसाळपणातून ही अफवा पसविल्याचे समोर आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीसांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटनाही घोडबंदर भागात घडली आहे. कासारवडवली येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने आठ दिवसांपुर्वी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला होता. त्यामध्ये त्याने एक कंपनी सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून ही माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, त्यावेळेस कंपनी बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या तरुणाने पुन्हा दूरध्वनी करून कंपनी बंद असल्याचे पोलिसांना कळविले. त्यावेळेसही पोलिसांनी तिथे जाऊन पाहाणी केली असता, त्यामध्ये कंपनी बंद असल्याचे समोर आले होते. त्याने तिसऱ्यांदा असाच प्रकार केला होता. त्यामुळे अफवा पसरविल्याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आपली कंपनी पुन्हा सुरू होईल, अशी धास्ती वाटत असल्यानेच असा दूरध्वनी केल्याचे त्याने पोलीस चौकशीत कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress on police action 144 thane rumor corona virus akp
First published on: 27-03-2020 at 00:13 IST