|| पूर्वा साडविलकर

विनापरवानगी प्रशिक्षण वर्गाना पायबंद; पालिकेच्या संकेतस्थळांवर अर्ज करण्याच्या सूचना

ठाणे :  विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करत असल्याचे कारण पुढे करत ठाणे महापालिकेच्या तरण तलावांमध्ये कोणतीही ठोस परवानगी न घेता जलतरणपटूंची मेगाभरती करणाऱ्या प्रशिक्षक आणि त्यांच्या संस्थांवर क्रीडा विभागाने अखेर पायबंद घातला आहे. यापुढे या तरण तलावात प्रवेश घेण्यासाठी जलतरणपटूंनी थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. प्रशिक्षकांचा एक मोठा गट परस्पर प्रशिक्षण वर्ग घेऊन व्यवसाय करत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे शहरात महापालिकेमार्फत मासुंदा तलावाजवळील कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कळवा येथील कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव चालविण्यात येतात. कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावात सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ६ यावेळी नवोदित जलतरपटूंचे वर्ग भरविले जातात. रात्री ८ ते १० यावेळेत राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंसाठी खासगी संस्थांकडून विशेष वर्ग घेण्याची परवानगी महापालिकेने यापूर्वी दिली होती. प्रत्यक्षात मात्र या विशेष प्रशिक्षण वर्गात खासगी प्रशिक्षकांनी नवोदित खेळाडूंना प्रवेश देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर गदा येत आहेच शिवाय या तरण तलावांमध्ये खासगी प्रशिक्षक आणि संस्थांची मनमानी वाढल्याच्या तक्रारीही सातत्याने पुढे येत होत्या. विशेष प्रशिक्षण वर्ग वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी असतील असे महापालिकेच्या ठरावात स्पष्ट करण्यात आले होते. तरीसुद्धा छुप्या पद्धतीने खासगी प्रशिक्षकांकडून या विशेष प्रशिक्षण वर्गात नवोदित खेळाडूंना प्रवेश दिला जात असल्याची बाब समोर आली आहे. तसेच महापालिकेच्या शुल्कांपेक्षा अधिकचे शुल्क खेळाडूंकडून आकारले जात असून खेळाडूंची आर्थिक पिळवणूक होत आहे, अशा तक्रारी होत्या. सातत्याने पुढे येणाऱ्या या तक्रारींची दखल घेत महापालिकेने हे विशेष प्रशिक्षण वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचबरोबर, तरण तलाव प्रवेशासाठी जलतरणपटूंनी थेट महापालिकेच्या संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आदेश महापालिका प्रशासाने दिले आहे. त्यामुळे खासगी संस्थांपुढे विशेष प्रशिक्षण वर्गाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंसाठी खासगी संस्थांना विशेष वर्ग घेण्याची परवानगी ठाणे महापालिकेने दिली होती. मात्र, तरी देखील खासगी प्रशिक्षकांनी या वर्गात नवोदित खेळाडूंचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले असून यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे.– मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठाणे महापालिका