म्हणे, ठाणे-नवी मुंबई प्रवास टोलमार्गे करा!
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्याकरिता नवीन खाडी पूल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आतापासूनच विटावाऐवजी ऐरोलीमार्गे वाहने नेण्याची सवय करावी, असा सल्ला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत वाहनचालकांना दिला. ठाणे, नवी मुंबई दरम्यान टोलमुक्त प्रवास करू इच्छिणाऱ्यांना कळवा-विटावा हे पर्याय आहेत. मात्र नव्या खाडी पुलाचे काम हाती घेताच या भागात वाहनांची कोंडी वाढेल. त्यामुळे ऐरोलीमार्गे प्रवास करावा असा सल्ला देताना चव्हाण यांना टोलचा दररोजचा भरुदड मोठा पडेल याचा मात्र विसर पडला.
दरम्यान, नियोजित खाडी पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल नेमके कसे असतील आणि या पुलाचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल याविषयी मात्र कोणतीही ठोस माहिती पोलीस अथवा महापालिकेने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे कळवा उड्डाणपुलाच्या कामाविषयी आणि त्या निमित्ताने होणाऱ्या वाहतूक बदलांविषयी प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण अजूनही कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाणे महापालिकेने १८३ कोटी रुपये खर्चून नवीन खाडी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र पुलाचे काम सुरू झाल्यानंतर या परिसरात आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर विचारले असता, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी वाहनचालकांनी ऐरोली-मुलुंडमार्गे ठाण्यातून ये-जा करावी, असा पर्याय सांगितला. ऐरोलीमार्गे वाहतूक वळविल्यानंतर ठाणे-कळवा-विटावा मार्गावर त्याचा कितपत परिणाम होतो, याचा अभ्यास करून त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र या पर्यायाचा अवलंब केल्यास वाहनचालकांना दररोज सुमारे ६० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालक याकडे वळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी कळवा परिसरातील वाहतूक कोंडी नजीकच्या काळात आणखी वाढण्याची भीती आहे.

वाहतूक बदलांविषयी अस्पष्टता
अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या कामाकरिता वाहतूक बदल नेमके कसे असतील आणि या पुलाचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल, याविषयी कोणतीही स्पष्टता त्यांच्याकडून देण्यात आली नाही. ‘ठाणे-कळवा-विटावाऐवजी ऐरोलीमार्गे वाहतूक वळविण्याशिवाय पर्याय नाही. मात्र या बदलामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळील निमुळत्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून ती सोडविण्याचा वाहतूक शाखा प्रयत्न करेल,’ असे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. तसेच विटावामार्गे अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असते. त्यामुळे पुलाच्या कामाकरिता या मार्गावरील अवजड वाहतूक १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्याचा विचार सुरू असून त्यासंबंधी ट्रक-टेम्पो संघटनांसोबत चर्चा सुरू आहे, असेही करंदीकर यांनी सांगितले.