मोबाइल, इंटरनेट बिले उशिरा मिळाल्यामुळे दंडाचा भरुदड
संवाद साधण्याचे आणि संदेश देण्याचे माध्यम असलेला टपाल विभाग बदलत्या काळात तत्पर ग्राहक सेवा देण्यात कमी पडत असल्याच्या बऱ्याच तक्रारी पुढे येत आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दोन्ही कंपन्यांची टेलिफोन व इंटरनेटची येणारी बिले टपाल खात्यामार्फत वाटली जातात. परंतु ही बिले अंतिम तारखेनंतर मिळाल्यामुळे ग्राहकांना दंड भरावा लागण्याचे प्रकार ठाण्यातील घोडबंदर, कासरवडवली भागांमध्ये दिसून आले आहे.
सर्वसाधारणपणे महिन्याच्या सुरुवातीलाच वीज बिल, गॅस बिल, टेलिफोन बिल आदी बिलांचा भरणा केला जातो. कारण एखादे बिल भरण्यास उशीर झाल्यास विनाकारण दंड भरावा लागतो. त्यामुळे जागृत ग्राहक वेळवर बिल भरणे करणे पसंत करतात. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ठाण्यातील काही भागांमध्ये टपालाच्या माध्यमातून येणारी बिले उशिराने ग्राहकांना मिळत असल्याने त्यांना दंड भरावा लागत आहे. काही ग्राहकांनी याबाबतीत टपाल खात्याकडे तक्रारीही केल्या आहेत.
याप्रकरणी टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दूरसंचार कंपन्यांकडून येणारी बिले ही अंतिम तारखेच्या काही दिवस आधीच येतात. आम्ही ती तातडीने वितरित करतो, असे सांगितले जाते.

संबंधित कंपन्यांची बिल छापाई ही नवी-मुंबईमध्ये होते. कंपन्यांकडून येणारी बिले ही अंतिम तारखेच्या एक ते दोन दिवस आधी आल्यामुळे कर्मचऱ्यांकडून कमीत-कमी वेळेमध्ये पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्याकडून या बाबतीत दिरंगाई होत नाही.
– टपाल अधिकारी, ठाणे</strong>