सहा वर्षांच्या आहनाचे कुरूपपण दूर होणार; शस्त्रक्रियेचा खर्च आयुक्त करणार
सहा वर्षांच्या आहना शर्माचे उंदराने नाक कुरतडले, पण घरची परिस्थिती बेताची असल्याने पालकांना तिच्यावर उपचार करणे शक्य झाले नाही. उपचाराअभावी तिच्या नशिबी कुरूपपण आले. शुक्रवारी शाळेच्या कार्यक्रमादरम्यान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे आहनाच्या नाकावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार असून तिचे कुरूपपण कायमचे दूर होणार आहे. या घटनेतून आयुक्त जयस्वाल यांच्यातील माणुसकीचे दर्शन ठाणेकरांना पुन्हा एकदा घडले आहे.
शुक्रवारी पालिका शाळेतील दिवस तिच्यासाठी एक आशेचा किरण घेऊनच उजाडला. शाळेतील कार्यक्रमासाठी पालिकेचे आयुक्त जयस्वाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आयुक्तांची नजर आपसूकच साऱ्या चिमुरडय़ांच्या चेहऱ्यावरील भाव टिपत असतानाच त्यांची नजर आहनाकडे गेली. तिच्याजवळ जाऊन आयुक्तांनी तिची चौकशी केली असता, त्यांना तिच्या घरची परिस्थिती आणि कुरूपपणाचे कारण समजले. जयस्वाल यांनी तत्काळ तिच्या पालकांशी संपर्क साधत तिच्यावरील शस्त्रक्रियेचा सर्व खर्च स्वत: करणार असल्याचे सांगितल्यामुळे शाळेतील कर्मचारी, शिक्षकवर्ग भारावून गेले , तर आहनाच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
धैर्यशील आहना
ठाणे महानगरपालिकेच्या मानपाडा शाळा क्रमांक ५४ येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात आहाना शर्मा (६) शिकते. घरची परिस्थिती बेताची असल्याने घरात एक वेळची जेवणाची भ्रांत आहे. एक दिवशी आहना झोपली असताना उंदराने तिचे नाक कुरतडले. आई-वडिलांना तिच्यावर केवळ प्राथमिक उपचार केले, शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता. इतरांसारखी न दिसणारी आहना शाळेत येताच सर्वाच्या नजरा तिच्यावर खिळत असत परंतु आपल्याकडे सारे जण असे का पाहतात, हे तिला समजत नव्हते. ती त्याच स्थितीत पूर्ण आत्मविश्वासाने दररोज शाळेत जाते. तिच्यातील हे शल्य तिला कळत नसले तरी पालकांना मुलीसाठी काही करू शकत नसल्याची खंत होती.
