शब्दांचे शब्दांवर प्रेम असते. अशा एकमेकांवर प्रेम करणाऱ्या शब्दांतून ओळी उमटत जातात आणि त्यातून एक लयबद्ध कविता तयार होते. शब्द आणि सुरांवर प्रेम करणारी माणसे एकत्र येतात तेव्हा कवितेचे गाणे होते. शब्दापासून गाण्यापर्यंतचा हा प्रवास अनुभवणे म्हणजे निखळ आनंद असतो. हा प्रवास जेव्हा गप्पांच्या ओघातून व्यक्त होतो, तेव्हा ऐकणाऱ्यालाही त्या प्रक्रियेचा भाग झाल्यासारखं वाटतं. असाच काहीसा सर्जनत्वाचा आनंद ठाणेकरांनी शनिवारी घेतला. निमित्त होतं काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मिनिथिएटरमध्ये रंगलेल्या गप्पाटप्पा आणि कविता या कार्यक्रमाचं.
भावभावनांना मोकळी करून देण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कविता. या कवितांना त्यांच्या शब्दांना जेव्हा सप्तसुरात स्थान मिळते त्या वेळी एखादी नववधू ज्याप्रमाणे सजून बसते अगदी त्याचप्रमाणे या कविता छान सजून रसिकांसमोर सादर होताना दिसतात. कार्यक्रमाची सुरुवात करतानाच अंबरीश देशपांडे आणि विक्रांत माळदे यांनी क्षण तुमचे, अनुभव आमचे सांगण्याचा मार्ग करू ‘सोपा होऊन जाऊ दे तुमच्या आमच्यात थोडय़ाशा गप्पाटप्पा’ असे म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांच्या या गप्पांमध्ये रसिकांनाही अगदी अलगद सामील करून घेतलं. त्यानंतरचा पुढचा सगळा वेळ रसिक आणि सादरकर्ते कवितांच्या पावसात न्हाऊन गेले. कधी रिमझिम पावसासारख्या सुखावणाऱ्या कविता तर कधी मोरपिसारा फुलवत मनाला थुई थुई नाचवणाऱ्या कविता, कधी मुसळधार बरसण्याने मनात आठवणींच्या ढगांची गर्दी जमवणाऱ्या कविता तर ऊन-पावसासारख्या खळखळून हसवणाऱ्या कविता.. अशा ‘शब्द’वर्षांवाने रसिकांना चिंब केले. प्रेम, कोकण, पाऊस इतकेच नव्हे तर मर्सिडीज, दगड आदी विषयांवर गाणी आणि कविता सादर करण्यात आल्या.
अंबरीश देशपांडे यांनी ‘शहाळ्याच्या पाण्यापरी गोड माणसे, आभाळाला सागराचे निळे आरसे’ असे लिहून कोकणी माणसाचे कौतुक केले. तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या दाहक अवस्थेचे विदारक वर्णनही वेगळ्या कवितेतून व्यक्त झाले. शब्दांना अनुभवाचा टेकू लागतो आणि एकमेकांच्या सुखदु:खात सामील झाल्यानंतर आपले अनुभव समृद्ध होतात, असेही अंबरीश म्हणाले.
जुनी गाणी जशी मनात खोलवर रुजतात, भावतात, तशीच नवीन गाणीही मनाला मोहून जावीत, यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे आदित्य बर्वे यांनी सांगितले. प्रतीक रानडे आणि केदार फडके यांनी ही गाणी आपल्या स्वरांत बद्ध केली तर निखिल फडके यांनी त्यांना तबल्याची साथ दिली.

नाटय़संगीताची ठाणेकरांवर मोहिनी
ठाणेकर रसिक संगीताचा भोक्ता आहे. अगदी सुगम संगीत असो की चित्रपट संगीत असो, कोणत्याही संगीतमय कार्यक्रमाला ठाणेकरांची गर्दी असतेच. पण नाटय़संगीत म्हटले की, ठाणेकरांचे हे संगीतप्रेम ओसंडून वाहते. असाच अनुभव शनिवारी सायंकाळी सहयोग मंदिर येथे झालेल्या नाटय़संगीताच्या वेळी आला. हरीची मुरली ऐकून गोपिका जशा दंग होऊ जात, तसाच काहीसा प्रकार ठाणेकरांच्या बाबतीत शनिवारी घडला. या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली की, बसायला जागा न मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी कोणतीही तक्रार न करता संपूर्ण कार्यक्रम उभ्यानेच अनुभवला.
नाटय़संगीताचा प्रसार आणि प्रचारच मुळात महाराष्ट्रातून झाला आणि त्यानंतर तमाम रसिकांनी या गाण्याला आपेलेसे केले. कुंपणाच्या वेलीवर उगवणाऱ्या मधुमालतीचा सुवास दूपर्यंत पसरलेला असतो. तरीदेखील त्या सुवासाचा शोध घेत आपण मधुमालतीची वेल शोधतो आणि सुवासाचा मनसोक्त आनंद लुटतो. अगदी त्याचप्रमाणे सप्तसुरांपासून दूर असणारे रसिकही सप्तसूर आणि गोड आवाजाच्या संगमाच्या ठिकाणी आवर्जून पोहोचतात. गप्पागोष्टी करताना एखाद्याचे वाक्य आवडले तर आपण सहज ‘क्या बात है ’ असे म्हणत त्या व्यक्तीला दाद देतो. त्याचप्रमाणे आवाजातील सुरांना संवादिनाची आणि तबल्याची दाद मिळते तेव्हा सूरच सुरांना दाद देतात आणि आपली व्याप्ती रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करतात. ही मदत प्रकाश चिटणीस यांनी संवादिनीवर साद देऊन केली तर सुहास चिटणीस अणि आदित्य पानळकर यांनी तबल्याची साथ दिली. या कार्यक्रमाची सुरुवात संगीत ‘मानपमान’ या नाटकामधील ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने करण्यात आली. भरतमुनीच्या पाचव्या अध्यायात नांदीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर ‘सौभद्र’ संगीत नाटकामधील ‘राधाधर मधुमिलिंद’ तसेच ‘सुवर्णतुला’ संगीत नाटकामधील ‘फुलला मनी वसंत बहार’ हे ऋतुवर्णनपर गीत सादर करण्यात आले. त्यानंतर धवल भागवत याने गायलेल्या ‘श्रीरंगा कमलाकांता’ या गाण्याने रसिकांनी वन्समोरची दाद दिली. त्यानंतर अनुजा वर्तक यांनी गायलेल्या ‘क्षण आला भाग्याचा’ या गाण्याने रसिकांना हा क्षण भाग्याचाच असल्याची जाणीव करून दिली. शब्दातून व्यक्त होताना रसिकांना आपलाच अनुभव गाण्यातून व्यक्त होत असल्याचे भासत होते.