मुंबई : दुर्मीळ अशा बाओबाब (गोरखचिंच) जातीची दोन झाडे विकासकामासाठी कापण्यास परवानगी दिल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केल्यानंतर अखेर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. गोरखचिंच झाडांच्या संवर्धनासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने आता पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये गोरखचिंचेच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
बाओबाब अर्थात गोरखचिंच या अत्यंत दुर्मीळ जातीची दोन झाडे मुंबईत दोन विविध ठिकाणी तोडल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. सांताक्रूझ येथील एस व्ही रोडवर आणि नंतर मार्वे येथे झाडे तोडण्यात आली. मुंबई मेट्रोच्या कामासाठी सांताक्रूझ येथील झाड तोडण्यात आले, तर मार्वे येथील झाड रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात आले होते. यामुळे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी कशी दिली अशी टीका होऊ लागली होती. या प्रकरणी पर्यावरणप्रेमींनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्याचा प्रयत्न केला. तसेच पालिका प्रशासनाकडेही दाद मागितली. त्यातच गेल्या आठवड्यात आरे वसाहतीतील आणखी एका बाओबाब वृक्षाची कशी दुर्दशा झाली आहे त्याबाबतचा मजकूर समाज माध्यमांवर टाकण्यात आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता या वृक्षाच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने रविवारी काढून टाकले. तसेच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक आळे करून त्यात माती टाकली. तसेच सांताक्रूझमध्ये हटविण्यात आलेल्या पुरातन गोरख चिंचेच्या झाडाच्या बदल्यात महानगरपालिकेच्या विविध उद्यानांमध्ये नव्याने गोरखचिंचेच्या झाडांचे संवर्धन महापालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…अल्पसंख्यांक याच मातीतील जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा, अनिल देसाई यांचे मत
गोरखचिंचेची लागवड करण्यासाठी उद्यान विभागाने विविध उद्यानांची निवड केली आहे. या उद्यानांमध्ये गोरख चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १० ते १५ वर्षांची मोठी रोप मागविण्यात आली आहेत. परंतु सध्या उष्मा जास्त असल्याने पुढील एक ते दोन आठवड्यात विविध उद्यानात त्यांचे रोपण करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.