दूध विक्रेत्यांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे ठाणेकरांना गेले काही दिवस नामांकित पाच ब्रॅण्ड्सचे दूध उपलब्ध होत नव्हते. परंतु शुक्रवारी दूध विक्रेते आणि दूध कंपन्या यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दूध विक्रेत्यांच्या कमिशनबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांनी दूध कंपन्यांवर घातलेला बहिष्कार मागे घेतला आहे.
ठाण्यातील दूध विक्रेत्यांच्या ‘ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थे’च्या वतीने मागील आठवडय़ामध्ये गोकुळ, महानंद, अमूल, मदर डेअरी आणि वारणा या कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार घातला होता. शुक्रवारी बैठक होऊन त्यामध्ये दूध विक्रेत्यांच्या मागण्यांवर पंधरा दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. रविवारपासून ग्राहकांना पाचही ब्रॅण्डचे दूध उपलब्ध होईल. तर सोमवारी ही दूध विक्री पूर्वपदावर येईल अशी माहिती दूध विक्रेते संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोरणेकर, अमरदीप दळवी आणि प्रकाश पायरे यांनी दिली.